Gokul Gite  
नाशिक

Gokul Gite MLC Oath Ceremony | नवनिर्वाचित गोकुळ गिते यांनी घेतली आमदारकीची शपथ

Gokul Gite MLC Oath Ceremony | मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांनी मंगळवारी (दि.२३) अधिकृतपणे विधान परिषदेच्या सभागृहात आमदारकीची शपथ घेतली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी गिते यांना आमदारकीची शपथ दिली.

निवडणूक निकालानंतर गोकुळ गिते हे मंगळवारी (दि.२३) सहकुटुंब विधान भवनात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला, बंधू गणेश गिते, भाजप नगरसेविका दीपाली गिते, कार्यकर्ते व मित्र-परिवार विधान भवनात उपस्थित होते. 'मी गोकुळ सुनीता बबन गिते, विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे

अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील. भारताचे सार्वभौम व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे. ते निष्ठापूर्वक पार पाडेन', अशी शपथ घेतली. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन केल्याची माहिती आमदार गिते यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुंडे-गिते गळाभेट

विधान भवनात एन्ट्री केल्याबरोबर गोकुळ गिते यांची पहिली भेट राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत झाली. दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली अन् फोटोही काढला. या भेटीची चर्चा चांगलीच रंगली.

'जय गिरीश महाजन'

शपथ पूर्ण झाल्यानंतर गोकुळ गिते यांनी 'जयहिंद, जय महराष्ट्र, जय शिवराय' असे म्हटले. तेवढ्यात कुणीतरी जय गिरीश महाजन... अशी घोषणा दिली अन् सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संधी सोडली नाही. 'अनऑफीशियल काही केलं असेल तर सांगून द्या, आता काही राहिलं नाही..' अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी करताच सभागृहात पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT