नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषद निवडणुकीच्या माघारीच्या अंतिम दिवशी राज्यभरात १७ पैकी ५ जागा खिशात घालत महायुतीने विजयाचा गुलाल उधळला असला, तरी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मात्र महायुतीला प्रचंड खिंडार पडले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरी शमवण्यासाठी लावलेली सर्व ताकद अखेर निष्फळ ठरली.
भाजपचे माजी सभापती गणेश गिते यांनी माघार घेतली असली, तरी त्यांचे बंधू गोकुळ गिते आणि दुसरे बंडखोर प्रसाद हिरे निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांच्यात तिरंगी सामना रंगणार हे स्पष्ट झाले असून, खरी लढत दराडे विरुद्ध गिते यांच्यातच थेट आणि अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे.
गुरुवारी सकाळपासूनच नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडत होत्या. सकाळच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गोरख बोडके आणि जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी युतीधर्म पाळत आपापले अर्ज मागे घेतले. दुसरीकडे, भाजपकडून बंडखोरी केलेले गणेश गिते यांची मनधरणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. ही मध्यस्थी यशस्वी ठरल्याचे वाटत असतानाच गणेश गिते दुपारी २.३० वाजता स्वतःचा अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
माध्यमांशी बोलताना गणेश गिते म्हणाले, 'आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत. गोकुळ गितेही लवकरच येतील आणि अर्ज मागे घेतील.' त्यानंतर गणेश गितेंच्या सहकाऱ्यांनी मीडियासमोरच फोन लावून गोकुळ गिते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, याच वेळी खरा स्फोट झाला.
अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी आपल्याला फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिली, असा खळबळजनक आरोप गोकुळ गिते यांनी केला. 'धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, लढणार आणि जिंकणारच!' अशी आक्रमक भूमिका घेत गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम राहिले. या एका फोनने महायुतीच्या नेत्यांचे सारे मनसुबे धुळीस मिळवले
महायुतीची कोंडी; विरोधकांचा गितेंना छुपा पाठिंबा?
मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गितेंना बाजूला सारण्यात यश मिळवले असले, तरी गोकुळ गिते रिंगणात कायम राहिल्याने शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीची मोठी कोंडी झाली आहे. त्यातच, गोकुळ गिते यांना महाविकास आघाडी आणि जिल्ह्यातील स्थानिक विरोधकांनी आधीच छुपा पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता या हायप्रोफाइल निवडणुकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार नक्की कोणाच्या पारड्यात मत टाकतात आणि कुणाला घरी पाठवतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.
प्रसाद हिरे नॉट रिचेबल; बंडखोरी कायम !
महायुतीची डोकेदुखी वाढवणारी दुसरी बाजू म्हणजे भाजपचे दुसरे नेते प्रसाद हिरे. माघारीच्या वेळेत प्रसाद हिरे यांच्याशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्कच होऊ शकला नाही. ते शेवटपर्यंत नॉट रिचेबल राहिल्याने त्यांचीही माघार होऊ शकली नाही. अखेर ९ अजपैिकी ६ जणांनी माघार घेतल्याने आता रिंगणात ३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.