MLC Election pudhari photo
नाशिक

Nashik MLC Election | संकटमोचकांमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत खलबते; सस्पेन्स वाढला

Nashik MLC Election | नाशिकमधील तिढा सोडविण्यासाठी मंत्री महाजन-सामंत मैदानात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील बंडाळीचे वादळ शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे बंडखोर नेते प्रसाद हिरे आणि माजी सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी महायुतीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात रविवारी (दि. ७) रात्री उशिरापर्यंत नाशिकमध्ये खलबते सुरू होती.

या हायव्होल्टेज बैठकीत अंतिम तोडगा नेमका काय झाला, हे अद्याप अधिकृतपणे समजू शकले नसले, तरी नाशिकच्या राजकीय वर्तुळातील सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. महायुतीत जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागांवर बंडखोरीमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक मंत्री महाजन हे रविवारी तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले.

दुसरीकडे, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत हेदेखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. गोविंदनगर परिसरातील एका बंगल्यात या दोन्ही मंत्र्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठक सुरू होती. या बैठकीला भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे, भाजप नेते गणेश गिते आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनाही बोलाविण्यात आले होते. यावेळी हिरे मंत्री महाजन यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.

बंडखोर उमेदवारांशी चर्चा सकारात्मक, महाजनही चर्चा करणार : सामंत

महायुतीतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी बंडखोर उमेदवारांशी झालेल्या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. गोकुळ गीते, प्रसाद हिरे आणि गणेश गिते यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी महायुतीमध्ये कोणतीही नकारात्मक नसल्याचा दावा केला.

परिस्थिती गिरीश महाजन यांना 'संकटमोचक' संबोधत सामंत यांनी उद्यापर्यंत सकारात्मक चित्र समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुन्हा एकदा सकाळी साडेअकरा वाजता बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांच्याबरोबर रविवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, महायुतीत जागावाटपानंतर काही इच्छुक उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले होते.

त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. सोमवारी (दि. ८) मंत्री महाजनदेखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना विनंती केली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी आणि समर्थकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सामंत यांनी सांगितले. गणेश गिते किंवा गोकुळ गीते यांना कोणतेही राजकीय अथवा पदाचे आश्वासन देण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT