नाशिक : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक अधिकारी पदाच्या वादावर अखेर गुरुवारी (दि.१६) निर्णय देण्यात आला आहे. निर्णयात दोन्ही अधिकाऱ्यांना प्रादेशिक अधिकारी पदाची संधी उपलब्ध करून दिली असून, याबाबतचा निर्णय उद्योग विभागाने पुढील सात दिवसांत घेण्याबाबतचे आदेश 'मॅट'ने दिले आहेत.
प्रतिनियुक्तीने प्रादेशिक अधिकारीपदी दीपक पाटील यांची वर्णी लावल्यानंतर त्यास गणेश राठोड यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून या प्रकरणावर मॅटमध्ये सुनावणी सुरू होती. गुरुवारी (दि.२३) याप्रकरणी अंतिम सुनावणी होऊन मॅटने निर्णय जाहीर केला. मात्र, त्यात स्पष्टता न ठेवता अधिकारी नियुक्तीचा चेंडू उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या कोर्टात टाकल्याने सात दिवसांनंतरच प्रादेशिक अधिकारीपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे. गुरुवारच्या सुनावणीत मॅटने, सरकारी बाजू आणि महसूल विभागाचे मूळ दस्तऐवजाची पडताळणी केल्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर येथील दोन्ही प्रादेशिक अधिकारी पदे रिक्त असल्याचे नमूद करताना, या ठिकाणी अधिकाऱ्यांची प्रत्येकी नियुक्ती केली जावी, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणाची वर्णी लावावी याबाबतचा निर्णय उद्योग विभागाने २३ जानेवारीपर्यंत मॅटकडे सादर करण्याबाबतचे आदेश दिले.
दरम्यान, २०२४ च्या मध्यापर्यंत अहिल्यानगरचा अतिरिक्त कार्यभार नाशिक प्रादेशिक अधिकाऱ्यांकडेच होता. मात्र, अहिल्यानगरला स्वतंत्र प्रादेशिक अधिकारी पद दिल्याने याठिकाणीदेखील प्रादेशिक अधिकाऱ्याची नियुक्ती प्रलंबित होती. अशात मॅटच्या निर्णयात नाशिक आणि अहिल्यानगरमधील रिक्त पदांवर या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी, असे उद्योग विभागाला आदेशित केले आहे.
मॅटच्या निकालानंतर नाशिक एमआयडीसीच्या आरओपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उद्योग वर्तुळात चर्चा रंगत आहे. दरम्यान, दीपक पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी पदामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. मंत्रीस्तरावरदेखील या पदासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले जात असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. अशात विभागातील मंत्र्यांची मर्जी राखण्यात जो अधिकारी यशस्वी ठरेल, त्याचीच वर्णी लागेल, अशीही चर्चा यानिमित्त रंगत आहे.