नाशिक : नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो सुरू करण्याच्या घोषणेला सहा वर्षांचा कालावधी उलटला तरी या घोषणेची परिपूर्ती होऊ शकली नसल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, आता नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो नव्हे तर नियमित मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.
शासनाच्या महारेल कंपनीमार्फत नाशिक शहराचा वाहतूक सर्वेक्षण आराखडा तयार केला जात आहे. येत्या १५ डिसेंबरला या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार शहरातील प्रवासीसंख्या ताशी २० हजारांवर गेल्याने नियमित मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, यावर नाशिकच्या मेट्रोचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नाशिककरांनी मतांद्वारे जोरदार प्रतिसाद देत नाशिक महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही २०१९ मध्ये नाशिकमध्ये देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. यासाठी २०२१ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात २१०० कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती.
महामेट्रोच्या माध्यमातून या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाणार होता. निओ मेट्रोसाठी दोन मार्गिका, स्थानकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. निओ मेट्रोसाठी द्वारका ते दत्तमंदिर (नाशिकरोड) दरम्यान डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याचेही जाहीर करण्यात आले होते. परंतु, यासंदर्भातील प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळू शकली नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला. दरम्यान, महारेलने केलेल्या नवीन सर्वेक्षणानुसार नाशिकमध्ये निओ मेट्रो नव्हे तर नियमित मेट्रो सुरू करण्यासाठी पोषक वातावरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अहवाल डिसेंबरमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.