नाशिक : महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येताच मेट्रोच्या स्वप्नपूर्तीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन व महामेट्रोने नव्याने वाहतूक सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यानंतर त्यानुसार तयार प्रकल्प अहवाल बुधवारी (दि. 21) मंत्रालयात सादर केला जाणार आहे. नाशिकमध्ये एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो धावणार की, पारंपरिक मेट्रो याचा फैसला या बैठकीतून होणार असल्याने नाशिककरांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
2017 च्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर वर्षभरातच देशातील पहिली टायरबेस मेट्रो निओ नाशिकमध्ये साकारण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी नाशिक महापालिकेने तयार केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचा आधार घेतला गेला. 2036 च्या लोकसंख्येचा विचार करून अर्बन मास ट्रान्झिट या दिल्ली (यूएमटीसी) स्थित कंपनीने हा आराखडा तयार केला होता.
या आराखड्याच्या आधारेच नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सिटीलिंक- कनेक्टेड नाशिक या शहर बससेवेची सुरुवात केली गेली. त्यातूनच पुढे नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो निओ सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मेट्रोसाठी दर तासाला 20 हजार प्रवाशांची वारंवारिता आवश्यक असताना नाशिकमध्ये प्रतितास 14 हजार प्रवाशांची वारंवारिता सर्वेक्षणात आढळल्याने टायरबेस मेट्रोचा पर्याय समोर आला होता. या मेट्रो निओकरिता मार्गिकादेखील निश्चित करण्यात आली.
द्वारका ते दत्तमंदिर या दरम्यान डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मेट्रो निओ प्रकल्पातूनच पुढे आला होता. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीस्तव प्रकल्पाची संचिका रखडल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरू शकला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील कामे राज्य शासनामार्फत करण्याची तयारी दर्शविल्यानंतर निओ मेट्रोच्या आशा पल्लवित बनल्या. टायरबेस मेट्रोची तयारी होत असतानाच महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनने टायरबेस मेट्रोऐवजी नियमित मेट्रोच्या अनुषंगाने नाशिकचा वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
सदरचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेकडे सादर करण्यात आला. या प्रकल्प अहवालाचे सादरीकरण बुधवारी मंत्रालयात होणार आहे. या अहवालाचा अभ्यास करून नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो चालणार की, पारंपरिक मेट्रो याचा निर्णय घेतला जाणार आहे.
असा होता मेट्रो निओचा प्रस्ताव
मेट्रो निओच्या पहिल्या टप्प्यात 31.40 किलोमीटर लांबीचे तीन मार्ग निश्चित करण्यात आले होते. त्यात 19 किलोमीटर लांबीचा पहिला मार्ग सातपूर- श्रमिकनगर- अमृतगार्डन- त्र्यंबक रस्ता- मोडक चौक- खडकाळी- सारडा चौक- द्वारका- पुणे महामार्ग- नाशिकरोड रेल्वे स्टेशन. दहा किलोमीटर लांबीचा दुसरा मार्ग- मुंबई नाका- अशोकस्तंभ- गंगापूर रोड- गंगापूर गाव. तर 2.24 किलोमीटर लांबीचा तिसरा मार्ग श्रमिकनगर- बारदान फाटा जोडून रिंग तयार करणे असे नियोजन होते. या प्रकल्पासाठी 2100 कोटींचा खर्च अपेक्षित होता.