नाशिक : आदिवासी विकास विभागात गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गांतील 611 पदांची सरळसेवा भरती होणार आहे. याबाबतची जाहिरात विभागाने शनिवारी (दि. 12) प्रसिद्ध केली आहे. (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024)
सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गांसाठी आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने शनिवार (दि. 12) पासून अर्ज उपलब्ध असून, दि. 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज तसेच विहीत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. सरळसेवा पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
सरळसेवा भरती अंतर्गत आयुक्तालय नाशिकमध्ये 17 जागा असून, अपर आयुक्त कार्यालयात 178, अपर आयुक्त ठाणे 189, अपर आयुक्त अमरावती 112, अपर आयुक्त नागपूर 1125 अशा एकूण 611 पदांवर मेगाभरती होणार आहे. यामध्ये उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, उपलेखापाल मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, आदिवासी विकास निरीक्षक, सहायक ग्रंथपाल, कॅमेरामन प्रोजेक्टर ऑपरेटर-कम, कनिष्ठ विस्तार अधिकारी या पदांवर भरती करण्यात येणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशत: बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आदिवासी आयुक्तांनी राखून ठेवलेले आहेत.
संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, अटी शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूद, पदनिहाय ऑनलाइन अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, मार्गदर्शक सूचना आदींसह भरतीबाबत अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभाग येथील अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.