नाशिक : उद्योगात नाशिकला नेहमीच उपेक्षित ठेवले जात असून, उद्योगांचा नाशिककरांचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी नाशिकला किमान दोन मेगा प्रकल्प द्यावेत, अशी मागणी निमा शिष्टमंडळाने विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या सहा दशकांपासून नाशिकची औद्योगिक वाटचाल सुरू आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात नाशिकचा उद्योग विस्तार थांबला आहे. सेवा उद्योग आणि उत्पादन उद्योगांची क्षमता वाढल्याने, त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच शहराची आर्थिक उलाढाल वाढण्यासाठी नाशिकमध्ये नवीन उद्योग येणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिकला तत्काळ दोन मेगा प्रकल्प दिले जावेत, अशी मागणी निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी याप्रसंगी केली.
तसेच कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शनासाठी केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाच्या जागेचा प्राधान्याने विचार व्हावा, निफाड तालुक्यात साकारल्या जात असलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या कामास गती द्यावी, आयटी उद्योगाचे जाळे विस्तारण्यासाठी आयटी प्रकल्प आणावेत, अंबड, सातपूर औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन, भुयारी गटार योजना या अमृत-२ योजनेत समाविष्ट करावे, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतल उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठीची एलबीटी कर निर्धारणाची समस्या मार्गी लावावी, अंबड औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशनच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी आयुक्त कुशवाह यांनी लवकरच नाशिकला मोठ्या उद्योग समूहाची गुंतवणूक दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन समस्या सोडविणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी निमाचे किशोर राठी, राजेंद्र अहिरे, मनीष रावल, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिलापूर येथील इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब त्वरित सुरू करावी, अशी मागणीही यावेळी केली. नाशिकचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या निओ मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सर्व्हिस रोड, ट्रक टर्मिनस, घनकचरा व्यवस्थापन, फायर स्टेशन, वीजपुरवठा व अन्य मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली.