himgouri 
नाशिक

Nashik Mayor Himgauri Aher Adke | विनापरवानगी रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार : महापौर

Nashik Mayor Himgauri Aher Adke | माजी सैनिक मृत्यूप्रकरणी ठेकेदार दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विनापरवाना रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत. सातपूर येथील रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या माजी सैनिकांबाबत पोलिसांचा अभिप्राय मागवून त्यात ठेकेदार दोषी असेल तर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच संबधित कुटुंबाला महापालिकेकडून आर्थिक मदत देण्याची घोषणादेखील महापौरांनी केली.

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तहकूब करण्यात आलेली मे व जून महिन्यातील दोन महासभा मंगळवारी (दि.३०) महापौर आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. या महासभांच्या पटलावरील ६४ प्रस्तावांना मंजुरी देताना सिहंस्थ कामांमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या लक्षवेधी प्रस्तावांवरून महासभेत वादळी चर्चा झाली.

विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर खराब झालेले रस्ते, खड्डे, आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले. म्हसरूळ येथे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उज्ज्वला गायकवाड यांच्या मृत्यूस रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याचा दावा करत सिंहस्थ कामे की नरबळीची व्यवस्था, असा सवाल प्रवीण जाधव यांनी केला. रस्त्यांची बोगस कामे करणाऱ्या एका तरी ठेकेदाराचे निलंबन कराल, अशी मागणी प्रशांत दिवे यांनी केली. तर शनिवारी पाणीकपात झाल्यानंतर रविवारीदेखील पाणी येत नसल्याने पाणीकपातीचा उलटाच ताप झाल्याचा आरोप आशा तडवी यांनी केला.

संग्रहित प्रभागातील दूषित पाणीपुरवठ्याची समस्या संध्या कुलकर्णी यांनी मांडली. किरण गामणे यांनी रस्त्यांवरील खड्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. तर अनेक ठेकेदारांकडून बेदरकारपणे शहरात खोदकाम केले जात असल्याचा आरोप शाहू खैरे यांनी केला. पंचवटीतील पाणीप्रश्नाला स्मार्ट सिटी कंपनी जबाबदार असून, कामाची मुदत उलटूनही ठेकेदार काम पूर्ण करत नाही, असा आरोप रोहिणी पिंगळे यांनी केला.

दिनकर पाटील भावुक

सातपूर येथील रस्ते अपघातात झालेल्या माजी सैनिकांच्या मृत्युप्रकरणी दिनकर पाटील यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांची व्यथा मांडताना पाटील यांना अश्रू अनावर झाले. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांनाही तो प्रशासनाने केला नाही. माजी सैनिकांच्या कुटुंबाला आता कोणी वाली नसल्याचे सांगत, पाटील यांना सभागृहात रडू कोसळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT