himgouri 
नाशिक

Nashik Mayor Himgouri Aher-Adke | आमदारांविरोधातील संघर्षाला महापौरांकडून पूर्णविराम

Nashik Mayor Himgouri Aher-Adke | महासभेतील 'ना हरकत' दाखल्याचे प्रस्ताव अखेर मंजूर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आमदारनिधीतील कामांना ना हरकत दाखला देण्यास नगरसेवकांनी कडाडून विरोध दर्शविल्यानंतर उभ्या राहिलेल्या आमदार विरुद्ध नगरसेवक संघर्षाला महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पूर्णविराम दिला. आमदार निधीतील कामांना ना हरकत दाखला देण्याच्या सर्व प्रस्तावांना महापौरांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महासभेत आता नगरसेवकांच्या प्रश्नांना महापौरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापुढील काळात ना हरकत दाखला दिला जाणार नसल्याची उपसूचना ठरावात अंतर्भूत केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापालिका हद्दीत आमदारांकडून सुचविण्यात आलेली कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी महासभेचा ना हरकत दाखला बंधनकारक आहे.

ही कामे महापालिकेच्या माध्यमातूनही करणे शक्य आहे. मात्र, गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत आमदार खासदार निधीतील शेकडो कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच करण्यात आली. त्यासाठी महापालिकेकडून ना हरकत दाखला देण्यात आला. महापालिकेत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे लोकशाही राजवट परतल्यानंतर पहिल्याच महासभेत नगरसेवकांनी आमदार निधीतील कामांच्या दर्जाविषयी संशय व्यक्त करीत या कामांसाठी ना हरकत दाखला न देण्याची आग्रही मागणी केली.

या कामांसाठी महापालिककडे सक्षम यंत्रणा आहे. कामांचे ऑडिट होत असल्याने महापालिकेमार्फत ही कामे करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवकांकडून महासभेत करण्यात आली. यानंतर महापौरांनी महासभेच्या पटलावरील ना हरकत दाखला देण्यासंदर्भातील प्रस्ताव नामंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असताना, भाजपच्याच आमदारांना महासभेत टार्गेट केले गेल्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह सीमा हिरे, सरोज आहिरे यांनी हा आमदारांच्या अधिकारावर गदा आणण्याचा भाग असल्याचा आरोप करताना, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. दरम्यान, महासभेतील प्रस्तावांवरील ठराव नगरसचिवांना प्राप्त झाले असून, त्यात ना हरकत दाखल्यासंदर्भातील सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

पहिल्या महासभेत आलेल्या प्रस्तावांना ना हरकत दाखला देण्यास मंजुरी देण्यात आली असून, यापुढील काळात अशा कामांसाठी ना हरकत दाखला दिला जाणार नसल्याची उपसूचना ठरावात मांडण्यात आली आहे.
हिमगौरी आहेर-आडके, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT