Matru Pitru Pujan Diwas Nashik 
नाशिक

Matru Pitru Pujan Diwas Nashik|नाशिकमध्ये व्हॅलेंटाइन डे नाही, तर मातृ-पितृदिन

Matru Pitru Pujan Diwas Nashik| देशभरातून हजारो विद्यार्थ्यांसह पालकही होणार सहभागी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाश्चात्त्य संस्कृतीचा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी नाशिक येथे योग वेदांत सेवा समितीच्या वतीने मातृ-पितृपूजन दिवस, पालक उपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

नाशिक येथे साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमात तेलंगणा, नोएडा आदी राज्यांसह देशभरातून सुमारे एक हजार पालक, विद्यार्थी आणि साधक परिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती योग वेदांत सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.

पाश्चात्त्य प्रेमाच्या दिवसाला पर्याय म्हणून भारतीय संस्कार आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व तरुण पिढीला पटवून देत हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, युवक युवतींना पाश्चात्त्य संस्कृतीऐवजी माता-पित्याप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले जाते.

या ग्लॅमरस उत्साहापेक्षा पालकांना सन्मान देण्याची भावना वाढविण्यासाठी योग वेदांत सेवा समितीच्या बालसंस्कार केंद्रामार्फत गेल्या २० वर्षांपासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.

मातृ-पितृपूजन दिवस हा केवळ धार्मिक किंवा सामाजिक उपक्रम नसून, तो कुटुंबसंस्थेच्या मूल्यांवर तसेच महत्त्वावर प्रकाश टाकतो. या दिवशी विद्यार्थी पालकांचे पूजन करून त्यांना तिलक लावतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात.

याच पार्श्वभूमीवर श्री योग वेदांत सेवा समिती नाशिकच्या वतीने सावरकरनगर येथील आश्रमात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परमपूज्य रामाभाई व ज्योत्स्नादीदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शाळा - महाविद्यालयांत जनजागृती

श्री योग वेदांत सेवा समितीचे कार्य संपूर्ण देशभरात सुरू असून, देशातील शाळा, महाविद्यालयांमध्येही मातृ-पितृ दिन साजरा केला जातो. यंदाही नाशिकमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये या दिवसाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

सुमारे २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे अभियान पोहोचविण्यात आले असून, नाशिक येथील आश्रमात देशभरातून साधक परिवार सहभागी होणार आहेत.

मातृ-पितृ पूजन दिवस हा केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. या उत्सवामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. गणपतीने आपल्या पालकांची म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली होती, या कथेवर आधारित हा सण आहे. यामुळे हा दिवस संस्कृतीतील मूल्ये आणि कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी प्रेरणादायी ठरतो.
- गजेंद्र चोपडे, अध्यक्ष, योग वेदांत सेवा समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT