नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेसाठी तात्पुरत्या अधिग्रहणाखाली घेतल्या जाणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्स व हॉल यांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून मालमत्ताधारकांना योग्य व वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी नाशिक मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अधिग्रहणाचा कालावधी, उपलब्ध सुविधा आणि प्रत्यक्ष व्यावसायिक नुकसान विचारात घेऊन मोबदला निश्चित करावा, अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे. मालमत्तेतील बांधकाम, भूखंडाचे स्वरूप, पार्किंग, स्वयंपाकगृह, वीज-पाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे, फर्निचर आणि अन्य सुविधांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे.
अधिग्रहणापूर्वी संबंधित मालमत्तांची संयुक्त पाहणी करून सद्यःस्थितीची छायाचित्रांसह नोंद तयार करावी. मालमत्ता परत करताना झालेली तोडफोड किंवा नुकसान तपासून नियमानुसार दुरुस्ती व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मोबदला निश्चित करण्यापूर्वी असोसिएशनचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक घ्यावी. मोबदला ठरवण्याची पारदर्शक पद्धत निश्चित करून मालमत्ताधारकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाला सहकार्य करताना मालमत्ताधारकांचे आर्थिक हित आणि कायदेशीर हक्क सुरक्षित ठेवावेत, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे. यावेळी नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप काकड, सचिव शंकरराव पिंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.