नाशिक : बांग्ला देशातील हिंदू नागरिक अन मंदिरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि.8) शहरातील पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको, गंगापूररोड/सातपूर आदी भागात सायंकाळी 5 वाजता मुक मोर्चे काढण्यात आले. यावेळी इस्कॉनतर्फे हरे कृष्णा, हरे रामा नामसंकिर्तनाचा जयघोषही करण्यात आला. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने सर्वत्र शांततेत अन सुरळीत मोर्चे पार पडले.
बांग्ला देशात गत महिन्याभरापासून अराजकता माजल्याचे दिसून येत आहे. येथील अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार होण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, इस्कॉन यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या मुकमोर्चात शहरातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी महिलांनी हिंदु के आस्थापर हमला क्यो, हिंदुओ को न्याय कब मिलेगा, एक है तो सेफ है, हिंदुओ की आस्थापर हमला क्यो आदी घोषणांचे फलक झळकविले.
नाशिकरोड
नाशिकरोड येथे बिटको पुलापासून मुक्तीधामपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणावर संतमंडळी, संघटनांचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते अन नागरिक सहभागी झाले होते. हरिनामाच्या गजरात बिटको चौकातून मोेर्चाला प्रारंभ झाला. मुक्तीधामपमंदिरापर्यंत आल्यावर समारोप करण्यात आला. मुक्तीधाम मंदिराच्या आवारात
भारतमाता पुजन करण्यात आले. नरसिंह कृपा प्रभुजी, जानकी नाथ प्रभुजी, शिवा महाराज आडके आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी भाषण करताना मान्यवरांनी भारत सरकारला बांग्लादेशातील हिंदू समाजाच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
----------
गंगापूररोड
गंगापूरोड येथील मोर्चाला महात्मानगर गणेशमंदिरापासून सुरुवात करण्यात आली. मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले, मोर्चा जेहान सर्कल, विद्याविकास सर्कल, कॉलेजरोडमार्गे महात्मानगर येथे पोहोचल्यावर समारोप करण्यात आला. यावेळी महिला व पुरुषांनी डाव्या हाताला काळ्या फिती लावून बांग्लादेशात हिंदुंवर होणार्या अत्याचाराचा निषेध नोंदविला.
---------
इंदिरानगर
इंदिरानगर परिसरात मोदकेश्वर मंदिर ते श्रीराम उद्यानपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. हिंदुंवरील अत्याचार बंद करा, एक है तो सेफ है आदी फलक झळकविण्यात आले. बांग्ला देशातील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
----------
पंचवटी
पंचवटीत पंचमुखी हनुमान मंदिर ते सीबीएस येथील हुतात्मा स्मारकापर्यंत मुकमोर्चा काढून बांग्लादेशातील हिंदुवरील अत्याचाराविरोधात निषेध करण्यात आला. पंचवटीकर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा चारहत्ती पुल, गजानन चौक, पाथरवट लेन, पंचवटी कारंजा, आरके, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड, मेहेर मार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत पोहोचला.
-------------
सिडको
सिडकोतही निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मनपसंत स्वीटजवळील पाटील स्कुलमार्गे त्रिमुर्ती चौक, दिव्या ऍडलॅब मार्गे पवननगर स्टेडीयम येथे पोहोचल्यानंतर समारोप करण्यात आला. निषेध मोर्चात महिला पुरुष सहभागी झाले. प्रत्येक चौकात वाहतुक थांबवून पोलीसांनी मोर्चाला वाट मोकळी करुन दिली. चोख बंदोबस्तामुळे मोर्चा शांततेत अन सुरळीत पार पडला.