मालेगाव (नाशिक) : विकासकामात अडथळा ठरणार्या डेरेदार वृक्षावर कुर्हाड चालविण्याऐवजी त्यांच्या पुनर्रोपणाचा प्रयोग पहिल्यांदाच दाभाडीत झाला.
मुंबई येथील इम्युनिटी बिल्डकॉन व सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ झाडाच्या पुर्नरोपणाचा प्रयोग राबविल्याने वृक्षप्रेमींनी या प्रयोगाचे स्वागत केले आहे. येथील सामान्य रुग्णालय येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामात सहा वटवृक्ष, दोन पिंपळ व दोन नारळ अशा आठ झाडांचा अडथळा ठरत असल्याचे लक्षात येताच इम्युनिटी बिल्डकॉन व बांधकाम विभागाने वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक झाडे पुनर्रोपणाचा अनुभव असलेल्या धुळे येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या सल्ल्यानुसार प्रारंभी ज्या झाडांचे पुनर्रोपण करायचे आहे. त्या झाडाच्या पारंब्या व फांद्यांचा विस्तार प्रारंभी छाटण्यात आला.
बुंध्याभोवती मुख्य मुळ्यांना धक्का लागणार नाही असे जेसीबीने दोन बाय दोन मीटर पर्यंत चहूबाजूने खोदकाम करण्यात आले. मुळांवर जैवऔषधाची फवारणी केल्यानंतर हा वृक्ष क्रेनच्या सहाय्याने अलगद उचलण्यात आला. मुळ्यांना इजा होऊ नये म्हणून कापडाने त्या मुळ्या गुंडाळण्यात आल्या. रुग्णालयाच्या वॉल कम्पाउंडला लागून बाहेरच्या बाजूला निश्चित केलेल्या जागेवर दोन बाय दोन फूट रुंदीचे खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यात रोपणापूर्वी एक टँकर पाणी, खते व योग्य प्रमाणात माती टाकून सुपीकता आणण्यात आली. त्यानंतर वटवृक्ष, पिंपळ व नारळ या वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. दाभाडीसह तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्ष पुनर्रोपणाचा पहिलाच प्रयोग होता. या पुनर्रोपणामुळे वृक्षप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
दाभाडी ग्रामीण रुग्णालयाचे विकासकाम करत असताना अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्यात आले. दाभाडीसह मालेगाव तालुक्यात हा वृक्ष पुनर्रोपणाचा पहिलाच प्रयोग आहे. विकासकामे होताना पर्यावरणाची काळजी घेणे काळाची व जगाची गरज आहे.तुषार अहिरे, वृक्षप्रेमी, मालेगाव, नाशिक.
विकासकामात अडथळा ठरणार्या आठही झाडांचे पुनर्रोपण केले आहे. तीन दिवसांआड या झाडांना टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विकासकामे करताना जी झाडे तोडावी लागतील, तेवढीच झाडे कंपनीतर्फे लावण्यात येणार आहेत.साहिल अहमद खान, प्रोजेक्ट व्यवस्थापक, इम्युनिटी बिल्डकॉन, नाशिक