नाशिक : महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली असून, या पुर्नरचनेनुसार कार्याला नाशिक परिमंडलात सोमवार (दि. १३) पासून सुरुवात झाली आहे. ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक तत्परतेने महावितरणची सेवा मिळणार आहे.
महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या दहासदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील, तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली ही कामे करणार आहेत. भागातील शाखा कार्यालयांमध्ये करण्यात आला आहे, तर ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला आहे.
पुनर्रचनेमुळे महसूल व देयकांच्या ग्राहकसेवेसाठी तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपविभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाच वेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रित (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करता येतील. कामाच्या नियमानुसार तास निश्चित होतील व कामाचा ताणदेखील कमी होणार आहे. कामाच्या विभागणीसाठी महावितरणने सहा महिन्यांपूर्वी ही योजना आखली होती. तिला प्रत्यक्ष रूप देत ग्राहकांना झटपट सेवा मिळण्यावर भर दिला आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी उपविभाग
नाशिक मंडळातील शहर विभाग क्रमांक १ व २ अंतर्गत असलेल्या नाशिकरोड उपविभाग (विद्युत भवन), पाथर्डी उपविभाग (पाथर्डी फाटा) गंगापूर १ उपविभाग (सातपूर एमआयडीसी), नाशिक ग्रामीण उपविभाग (शिंदेगाव), नाशिक ग्रामीण उपविभाग (त्र्यंबक), सातपूर उपविभाग (शरणपूर रोड) आणि नाशिक शहर उपविभाग (भद्रकाली) हे सर्व उपविभाग कार्यालय संचलन व सुव्यवस्था (देखभाल व दुरुस्ती) उपविभाग म्हणून कार्य करणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यालयांच्या रचनेत कोणताही बदल न करता केवळ मनुष्यबळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.