नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१४) राज्यभरात शांततेत मतदान झाले. १७ जागांसाठी १६ केंद्रांवर ९६.१२ टक्के मतदान झाले. नाशिक गटात सर्व १६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर ९ केंद्रावर १०० टक्के मतदानाची नोंद झाली. रविवारी (दि.१६) मतमोजणी होणार आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या १७ जागांसाठी २०१० नंतर निवडणूक होत आहे. अहिल्यानगर-पुणे-रायगड व अमरावती या गटातील जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी १६ केंद्रावर ८२४ पैकी ७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जव्हार, शहापूर, नाशिक, नंदुरबार, किनवट, यवतमाळ, नागपूर, देवरी, चंद्रपूर येथे १०० टक्के मतदान झाले. खेड केंद्रावर फक्त ५४ टक्के मतदान झाले. अकोले (८१.०८), धुळे (९६.९७), रावेर (८३.३३), चिखलदरा (८४.८५), गडचिरोली (९८.२८) व अहेरी (९७.३३ टक्के) मतदान झाले. रविवारी सकाळी ९ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.
नाशिक गटात नाट्यमय घडामोडी
नाशिक गटातत ७ उमेदवार रिंगणात होते. यात मंत्री झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजीत गावित यांचा समावेश आहे. खोसकर यांनी एेनवेळी माघारीचे पक्ष दिले होते. झिरवाळ व गावित यांची आघाडी झाली.
मंत्री झिरवाळ ठाण मांडून
नाशिक गटासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शुक्रवारी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान झाले. १२ पर्यंत ९० टक्के मतदान झाले. मंत्री नरहरी झिरवाळ व माजी आमदार जे. पी. गावित मतदान केंद्रावर ठाण मांडून होते.