नाशिक : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्याप्रमाणे 'सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश' करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तबगारीचा आणि जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची धुरा यशस्वीपणे पुढे घेऊन जात असलेल्या महाकुंभ नेतृत्वाचा सन्मान सोहळा रविवारी (दि.९) त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील फ्रावशी अकॅडमीत दिमाखदारपणे पार पडला. दैनिक 'पुढारी'तर्फे आयोजित 'महाकुंभ नेतृत्व अन् खाकी सन्मान-२०२५' हा विशेष सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
प्रशासन, पोलिस आणि साधू, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत रंगलेल्या या विशेष सोहळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंग, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक बासाहेब पाटील, आदिवासी विभागाचे सहआयुक्त किरण जोशी, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, फ्रावशी अकॅडमीचे संस्थापक रतन लथ यांच्यासह अखिल भारतीय दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास महाराज, निरंजनी आखाड्याचे महंत धनंजयगिरी महाराज, आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्याच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर साधु, महंतांच्या हस्ते व्यासपीठावर उपस्थित सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने, एकदिलाने प्रयत्न करण्याचा जणू काही संकल्पच उपस्थित अधिकारी आणि साधू, महंतांनी बोलून दाखविला.
सोहळ्यात 'खाकी'चा सन्मान हे विशेष आकर्षण ठरले. 'सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश' करताना जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी सांगण्यात आलेल्या पुरस्कार्थींच्या शौर्यगाथा अंगावर शहारे आणणाऱ्या ठरल्या. तसेच सक्षम हातात नाशिककरांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची जाणीवही करून देणाऱ्या ठरल्या. सर्व कर्तव्यनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना साधू, महंतांसह उपस्थितांचा उर अभिमानाने भरून आला हाेता. साधू, महंतांचे आशिर्वाद, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा एक कौटुंबिक सोहळाच ठरला. सोहळ्याचे प्रास्ताविक दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले. सूत्रसंचालन अभिनेता हर्षल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दैनिक 'पुढारी'चे युनिट हेड बाळासाहेब वाजे यांनी केले.
नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला
नाशिककरांना सुरक्षेची प्रबळ हमी देणाऱ्या 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' या मोहिमेचेही सोहळ्यात कौतुक केले गेले. उपस्थित साधु, महंतांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे तोंडभरून कौतुक केले. तर आयुक्त कर्णिक यांनी, या मोहिमेचे खरे हिरो आमचे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगत सर्वांचीच मने जिंकली. फ्रावशी अकॅडमीचे संस्थापक रतन लथ यांनी, या मोहिमेसाठी टाळ्यांच्या गजरात पोलिस आयुक्त कर्णिक यांचे उभे राहून आभार मानले. सोहळ्यात काही गुन्हेगारांनी हात जोडून म्हटलेले 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' हे व्हिडीओ प्रसिद्ध केले गेले.