इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे बम बम बोलेच्या गजरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सवात रहाटपाळणे आदी जय्यत तयारी करण्यात आली. (छाया : वाल्मिक गवांदे)
नाशिक

Nashik MahaShivratri | महाशिवरात्रीनिमित्त आज ‘बम बम भोले’चा गजर

सर्वतीर्थ टाकेद : टाकेदला उत्सवाची जय्यत तयारी

पुढारी वृत्तसेवा

धामणगाव (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे बम बम बोलेच्या गजरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (दि. 26) यात्रोत्सव साजरा होत आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाही यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीसाठी नाशिक, अहिल्यानगर, ठाणे व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी येतात. इगतपुरी तालुक्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात या यात्रेचा आनंद घेतात. यात्रेत लहान- मोठी दुकाने, थंडपेय, किराणा दुकान, हॉटेल, रहाट पाळणे, भेळभत्त्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.

मंदिर व्यवस्थापन सचिव किशोर वैष्णवदास यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची तयारी करण्यात येते. मंदिराला रंगरंगोटी, कुंडाची साफसफाई, श्रीराम प्रभूच्या मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घोटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रोत्सवात चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम केले जाते. तसेच एसटी महामंडळाकडून घोटी, नाशिक येथून येणार्‍या प्रवाशांसाठी बस सुविधा पुरविण्यात येते. यात्रेत महामंडळाचा स्वतंत्र डेपो असतो. स्वयंसेवी संस्थाांर्फत रस्त्याने अनेक भक्तांच्या सोयीसाठी फराळ वाटप केंद्र असतात. ग्रामपंचायत टाकेद यांचे सहकार्य यात्रोत्सवासाठी असते. टाकेद गावातून दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे.

रामायण पार्श्वभूमीमुळे सर्वतीर्थ टाकेद प्रख्यात

रामायणात श्रीक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद येथे महत्त्वपूर्ण घटना घडलेली असल्याने या क्षेत्राला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. रावणाने जटायूचा वध केला, त्यावेळी जटायूचा जीव कासासावीस झाला होता. माता सीतेच्या शोधार्थ निघालेले प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांना वाटेत जटायू जखमी अवस्थेत आढळला. जटायूला जीवदान देण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांची बाण मारला व सर्वतीर्थांचे पाणी प्रकट केले, अशी आख्यायिका आहे. सर्वतीर्थाच्या पाण्यामध्ये प्रयागराज, काशीचे पाणी उशिरा प्रकट झाले, ते लहान कुंडात बाजूला असून सर्व तीर्थांचे पाणी मोठ्या कुंडात आहे. या कुंडात सर्वतीर्थांच्या पाण्यात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक स्नान करत असतात. महाशिवरात्री साजरी करताना भाविक रात्री 12 वाजता अंघोळ करतात व भाग्यवान भक्तांना कुंडात असलेल्या गोमुखातून दुधाची धार प्रकट होऊन दृष्टिक्षेपात पडते अशी आख्यायिका आहे.

मुसळगावला पाच दिवस यात्रोत्सव

सिन्नर तालुक्यातील दातली येथे महाशिवरात्रीनिमित्त मुसळगाव येथे मुसळेश्वर महादेव यात्रोत्सवाची सुरुवात बुधवार (दि. 26) पासून होणार आहे. यात्रोत्सव कालावधीत सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेनिमित्त मुसळेश्वर मंदिराची रंगरंगोटी करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. यात्रोत्सव काळात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आव्हान यात्रा कमिटीसह ग्रामस्थांनी केले आहे.

पाच दिवस विविध कार्यक्रम

पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या साथीने कावडी मिरवणूक, रात्री कैवल्य महाराज जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन, दुसर्‍या दिवशी शोभेची दारू, बोहडा अघोरी सोंगाचे कार्यक्रम, तिसर्‍या दिवशी माळावरची गंत, हिंदवी पाटील आर्केस्ट्रा, चौथ्या दिवशी दुपारी कुस्ती दंगल, रात्री तुकाराम खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा, तर पाचव्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

निर्‍हाळे फत्तेपूर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

सिन्नर तालुक्यातील निर्‍हाळे फत्तेपूर येथे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (दि. 26) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवरात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड यांनी सांगितले आहे.

महादेव मंदिरात बुधवारी सकाळी भगवान महादेव देवस्थान अभिषेक व पूजा, आरती, भजन आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गंगाजलाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता दत्ता महाराज निफाडकर यांचे कीर्तन होणार आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी श्री राम भजनी व महादेव प्रसादिक भजनी मंडळ, शिवरात्रोत्सव कमिटीचे सभासद परिश्रम घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT