नाशिक : सातपूर येथील गोळीबार प्रकरणानंतर माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाडेतत्त्वावर घेतलेल्या घराला खाली करण्यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपात प्रकाश लोंढे, त्यांचे पुत्र दीपक व भूषण लोंढे तसेच सनी विठ्ठलकर, निखिल निकुंभ आणि सुनील साखरे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मयत पत्नीच्या नावावर असलेला पुष्कर बंगला आणि पुष्कर कंपनीतून घेतलेले १ कोटी ७० लाख रुपये कर्ज यांचा भाडेतत्त्वावर वापर करण्यासाठी त्यांनी लोंढे यांच्याशी करार केला होता. २०२१ मध्ये हा बंगला भाडेतत्त्वावर देण्याचा ठरला. मात्र, आरोपी लोंढे यांनी भाडे करारनाम्याशिवाय बंगला स्वतःच्या संपर्क कार्यालयासाठी वापरला.
फिर्यादींनी भाडे मागितल्यावर लोंढे व त्यांच्या मुलांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली आणि बंगल्यातून हाकलून दिले. सप्टेंबर २०२५ मध्ये फिर्यादींना माहिती मिळाली की, सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ हे त्यांच्या कुटुंबासह बंगल्यात राहत आहेत आणि त्यांनी २ कोटी रुपये न दिल्यास बंगला खाली करण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादींनी तक्रार नोंदवली आहे.