नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर येताच, मराठा समाजाकडून गुरुवारी (दि. १६) पत्रकार परिषद घेत कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशातही समाज माध्यमांवर पाठिंब्याचे वृत्त व्हायरल होत असल्याने, मराठा आंदोलकांकडून शुक्रवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे बैठक घेत, मराठा समाज तटस्थ राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वंचितच्या उमेदवाराने मांडलेला पाठिंब्याचा प्रस्तावही नाकारण्यात आला.
आंदोलनकर्ते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी (दि. १६) झालेल्या प्रकाराबद्दल व त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर समाजात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याच्या मत उपस्थितांनी व्यक्त केले. या चर्चांना पूर्णविराम मिळून समाज एकसंघ रहावा या भूमिकेने ही बैठक घेण्यात आल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाज नाशिकच्यावतीने पाठिंब्याबाबत घेण्यात आलेला निर्णय ही एक चुक होती. त्यामुळे या चर्चांवर पडदा टाकण्याची गरज आहे. मराठा समाजासाठी जो लढेल, समाज त्यालाच कौल देईल या मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेला धरून समाज पुढे जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा कोणासही पाठिंबा नसल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विलास पांगारकर, शरद तुंगार, चेतन शेलार, तुषार जगताप, राम खुर्दळ यांनी भूमिका मांडली. निवडणूकीत जो समाजाचा त्यालाच मराठा समाज स्विकारेल, असेही मत याप्रसंगी उपस्थित केले. यावेळी नितीन डांगे-पाटील, श्रीराम निकम, सचिन पाटील, तुषार जगताप, महेश शेळके, आशिष हिरे, महेंद्र देहरे, भारत पिंगळे आदी उपस्थित होते.
शंभर रुपयांचा स्टॅम्प अन् जाहीरनामा
वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी बैठकीत उपस्थित राहत, गेल्या १५ वर्षांपासून समाजासाठी लढत असताना एकतर्फी भूमिका का जाहीर केली असा सवाल उपस्थित केला. तसेच शंभर रुपयांचा स्टॅम्प आणि जाहीरनामा आंदोलक नाना बच्छाव यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र मराठा समाज तटस्थ राहणार असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले.
हेही वाचा-