नाशिक

Nashik Lok Sabha 2024 | कांदा उत्पादकांची मतदान केंद्रावर संतापाची फोडणी

अंजली राऊत

चांदवड : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वडगावपंगू (ता. चांदवड) येथे काही तरुण शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत मतदान केंद्राकडे कूच केली. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून समजूत काढत माळा मतदान केंद्रावर नेऊ नये अशी विनंती केली. त्यानंतर तरुणांनी माळा काढून मतदान केले.

चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू येथे गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी आलेले शेतकरी. (छाया : सुनील थोरे)

तालुक्यात कांदा पीक हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. चालू वर्षी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव गडगडले होते. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. यांचा फटका लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ नये, यासाठी केंद्राने कांद्याची निर्यातबंदी काही अटींवर शिथिल केली. पण त्याचा फारसा प्रभाव शेतकऱ्यांवर झाला नाही. हाच रोष मतदानाच्या दिवशी तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा निमगाव वाकडा येथे रोष

लासलगाव : सोमवारी (दि. २०) पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी येवला विधानसभा मतदार संघातील लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या बाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत 'ज्यांनी केली निर्यातबंदी त्यांना मतदानाला बंदी', शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. मात्र, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भास्कार शिंदे यांनी आंदोलकांना कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानासाठी न जाण्याचे आवाहन केले. त्यास या आंदोलकांनी प्रतिसाद देत कांद्याच्या माळा काढून आपला मतदानाचा हक्क बजावला.

लासलगाव कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक ललित दरेकर, संदीप गायकर, अंबादास गायकर, कृष्णा गायकर, भाऊराव सोनवणे, ललित पूरकर, मच्छिंद्र गायकर, चेतन माळी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणाबाबत निषेध करण्यासाठी कांद्याच्या माळा गळ्यात घालत निदर्शने केली.

नैताळे येथे कांद्याच्या माळा घालून मतदान
दिंडोरी लोकसभा संघातील निफाड विधानसभा मतदारसंघातील नैताळे येथे कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून सकाळी मतदारांनी मतदान केल्याचा प्रकारही समोर आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT