नाशिक : खरीप व रब्बी हंगामात रासायनिक खते, बियाणे आणि किटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने नाशिक विभागातील परवानाधारक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २२ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, ६३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यात ४७, जळगावमध्ये २९ आणि धुळे जिल्ह्यात १३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्हा कृषी विभागाच्या अहवालानुसार, एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या नऊ महिन्यांत बियाणे, खते आणि किटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. गुणनियंत्रण विभागाने बियाणांचे ३,५६९, खतांचे १,६३८ आणि किटकनाशकांचे १,०२० नमुने संकलित केले. प्रयोगशाळा चाचण्यांनंतर काही नमुने अप्रमाणित आढळले, ज्यामुळे संबंधित परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अप्रमाणित नमुन्यांमध्ये बियाणांचे ५९, खतांचे १२१ आणि किटकनाशकांचे २४ नमुने आढळले. यासंदर्भात परवानाधारक विक्रेत्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण विभागातून बियाण्यांची २,३६३ पाकिटे, ६४.१४ मेट्रिक टन खतसाठा आणि १,७८८ लिटर किटकनाशके जप्त केली आहेत.
याशिवाय, २४ परवानाधारक विक्रेत्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १७ बियाणे विक्रेते, ५ खते विक्रेते आणि २ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच, ६३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यात ३० बियाणे विक्रेते, ३० खते विक्रेते आणि ३ किटकनाशक विक्रेते आहेत. याशिवाय, ११ बियाणे विक्रेते आणि १० खते विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर एका किटकनाशक विक्रेत्याचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात ३ आणि नंदूरबार जिल्ह्यात ४ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
ज्या विक्रेत्यांविरोधात पोलिस गुन्हे दाखल केले आहेत. त्यात धुळे जिल्हा आाघाडीवर आहे. याठिकाणी नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सहा, नंदूरबार जिल्ह्यात पाच तर नाशिक जिल्ह्यात चार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.