देवळाली कॅम्प (नाशिक): जयभवानी रोड, वडनेर गट, एकलहरे, देवळाली कॅम्प आदी लष्करी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. देवळाली कॅम्पच्या लॅम रोडवरील देवजी खेतसी आरोग्यधाम सोसायटीत बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सागर गोडसे, अरुण जाधव, पोपटराव जाधव, दत्तू पाळदे, बब्बू गोडसे आदींनी केली आहे.
देवळाली शहर परिसरात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. येथील लॅम रोडवरील देवजी आरोग्यधाममध्ये गेल्या 21 एप्रिलला रात्री दोन बिबटे मुक्तपणे संचार करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली कॅम्पचे रस्ते सायंकाळी व पहाटे सामसूम होत आहेत. रात्री कामावरून येणारे कर्मचारी, पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. रस्ते लॅम रोडवर वनविभागाने पिंजरा ठेवण्याची मागणी नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॅम रोड परिसरात सहा वेळा बिबट्याचेे दर्शन झाले आहे. त्यामुळे हा परिसर सायंकाळी रहिवाशांसाठी अतिशय धोकादायक बनला आहे.
बिबट्याची जोडी लॅम रोड परिसरात फिरत असल्याने येथील देवजी खेतजी सॅनेटोरियममध्ये वनविभागाने पिंजरा लावला आहे. वनविभागाचे विजयसिंह पाटील, अशोक खांजोडे, सोमनाथ निंबेकर आदींच्या पथकाने हा पिंजरा उभा केला आहे.