देवळा : देवळा तालुक्यातील वाखारी येथे बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून, मंगळवारी ( दि १७ ) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे व एक गाय ठार झाल्याच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण र्निमाण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , वाखारी येथील कापराई शिवारातील शेतकरी श्रावण दगा बागुल यांच्या मालकीच्या गट नंबर 14/ 2 1मध्ये (दि १७) रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्यात दोन वासरे ठार झाली असून , दुसऱ्या दिवशी बुधवारी ( दि १८) रोजी रात्री याठिकाणी वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत आहेर वस्ती येथील माणिक दादाजी आहेर यांच्या मालकीच्या (गट नंबर १०१२ ) मध्ये बिबट्याने हल्ला चढवत गाईचा फडशा पाडला .
सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या आदेशानुसार वन परिमंडळ अधिकारी श्रीमती डी.पी.चौधरी , वनरक्षक श्रीमती एस.बी.मरशिवणे आदी वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .या परीसरात सतत बिबट्याच्या हल्ल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून ,बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.