नाशिक : निखिल रोकडे
‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेमुळे गेल्या काही महिन्यांत शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला. अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत त्यांची सत्ता मोडून काढण्यात आली. मात्र, महापालिका निवडणुकीच्या रणांगणात हेच चेहरे किंवा त्यांचे कुटुंबीय पुन्हा जनतेच्या दरबारात उभे राहिले आहेत. कायद्याच्या कारवाईला मतांची सहानुभूती मिळते की नाही, याचा फैसला मतमोजणीच्या निकालातून होणार आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अनेक नामवंत गुन्हेगारांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले. काहींना शहराबाहेर जावे लागले. काही थेट कारागृहात पोहोचले. मोठ्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने त्यांच्या भोवतीचे कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’ काही काळ विरळ झाले होते. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचे व त्यांच्या समर्थकांचे नेटवर्क सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले.
महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले असून, गुरुवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी थेट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचे वास्तव समोर आले आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्यांचे राजकीय अस्तित्व संपले, अशी चर्चा असतानाच त्यांनी किंवा त्यांच्या वारसांनी निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात मकोका कारवाई झालेले माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे, पंचवटी गोळीबार प्रकरणातील आरोपी जगदीश पाटील, राहुल धोत्रे हत्याकांडातील आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा समावेश आहे.
प्रकाश लोंढे यांची सून दीक्षा दीपक लोंढे, उद्धव निमसे यांचे चिरंजीव रिद्धेश उद्धव निमसे हे कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत निवडणूक लढवत आहेत. याशिवाय भाजप नेते सुनील बागूल यांचे चिरंजीव मनीष बागूल, माजी प्रभाग सभापती पवन पवार यांच्या आई आशा पवार, योगेश शेवरे, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, सूर्यकांत लवटे आणि बंटी शेख हे उमेदवारही चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, नाशिक मनपा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच कारागृहातून निवडणूक लढवण्याचा प्रकार घडला आहे. कायद्याच्या बालेकिल्ल्यात पराभूत झालेले चेहरे जनतेच्या कौलातून पुन्हा उभारी घेतात की मतपेटीतून त्यांना नकार मिळतो, याचा निर्णय शुक्रवारच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
कारागृहातून प्रथमच निवडणूक
प्रभाग 11 मधून माजी नगरसेवक तथा रिपाइं नेते प्रकाश लोंढे यांनी मकोका कारवाई अंतर्गत कारागृहातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गंभीर गुन्ह्यांमुळे त्यांना लवकर जामीन मिळण्याची शक्यता कमी असल्याने कारागृहातून लढवलेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.