नाशिक : पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनाही भोवले असून, सुधाकर बडगुजर यांच्यापाठोपाठ शिंदे यांचीही शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांच्या जागेवर महानगरप्रमुखपदी श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात 'एक्स'पोस्ट केली आहे.
ठाकरे गटाचे तत्कालीन उपनेते बडगुजर यांनी पक्षातील खदखद उघडपणे बोलून दाखवत नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली हजेरी विलास शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट करणारी होती. यानंतर शिंदे यांनी मिसळ पार्टी आयोजित करून उघडपणे नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
पक्षात विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ नगरसेवक, पदाधिकारी नाराज असल्याचे विधान सुधाकर बडगुजर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची सत्यता पडताळून बघणे आणि त्यानुसार डॅमेज कंट्रोल करणे पक्षाने अपेक्षित असताना त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली. आता विलास शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरल्याने बडगुजर यांचे विधान खरे ठरले आहे. शिंदे यांचीही हकालपट्टी करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली आहे.
खा. संजय राऊत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी महानगरप्रमुखपदी ज्यांची नियुक्ती केली त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. पक्षाशी निष्ठावान राहून प्रामाणिकपणे मत व्यक्त केल्याबद्दल पक्षाने आपल्याला हकालपट्टीचे बक्षीस दिले याबद्दल पक्षनेत्यांचे धन्यवाद.विलास शिंदे, माजी महानगरप्रमुख, ठाकरे गट
विलास शिंदे यांनी पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षशिस्त मोडली आहे. त्यामुळे महानगरप्रमुखपदावर मामा राजवाडे यांची नियुक्ती केली आहे. त्या संदर्भातील आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत.दत्ता गायकवाड, उपनेते, शिवसेना ठाकरे गट