MIDC | Maharashtra Industrial Development Corporation
MIDC | Maharashtra Industrial Development Corporation file photo
नाशिक

Nashik Latest Industry News | जिल्ह्यात उभी राहणार पंधरावी ‘एमआयडीसी’

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : तब्बल १४ औद्योगिक वसाहती असलेल्या नाशिक जिल्ह्यात आता पंधरावी औद्याेगिक वसाहत उभी राहणार असून, त्यास राज्य शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासात भर घालणारी ही वसाहत मनमाड व परिसरात उभारली जाणार असल्याने, या भागातील रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मनमाड औद्योगिक वसाहतीस अंतिम मंजुरी मिळाली असून मनमाड शहराजवळील सटाणे व अनकवाडे येथे ही वसाहत उभारली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत औद्याेगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती या वसाहतीला अंतिम मंजुरी देण्यात आली.

उद्योगांसाठी अत्यंत पोषक समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्याेगिक वसाहती उभ्या राहत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहत असून, त्यात आता आणखी एका वसाहतीची भर पडेल. मनमाड शहराजवळील सटाणे व अनकवाडे येथे ही वसाहत उभारली जाणार आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. बुधवारी (दि. १०) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत औद्याेगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती या वसाहतीला अंतिम मंजुरी देण्यात आली. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे मागील दोन वर्षांपासून या वसाहतीसाठी पाठपुरावा करीत होते. त्यास उद्योगमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

याविषयी गेल्या २ जुलै रोजी मंत्रालयात बैठक होऊन ३ जुलै रोजी 'एमआयडीसी'च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रस्तावित क्षेत्र सटाणे व अनकवाडे येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास अंतिम मंजुरी दिल्याचे लेखी पत्र दिले आहे. नव्या उद्योगांसाठी ही वसाहत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वनविभागाचा ना हरकत दाखला

मनमाड (ता. नांदगाव) येथील सटाणे व अनकवाडे येथील प्रस्तावित क्षेत्राबाबत वनविभागाने १२ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत ना हरकत दाखला दिला होता. त्यानुसार, या प्रस्तावित जागेवर औद्योगिक क्षेत्र स्थापन केले जाणार आहे. तसेच सटाणे व अनकवाडे या दोन गावांतील औद्योगिक क्षेत्राला जोडणारा रस्ता तयार करून औद्योगिक महामंडळाकडे वर्ग करण्याचे आदेशही याच पत्रात देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख एमआयडीसी

सातपूर, अंबड, सिन्नर, गोंदे (इगतपुरी), कळवण, शिंदे, वाडीव-हे मुंडेगाव, अजंग-रावळगाव, पालखेड, अक्राळे, तळेगाव, खतवड, पिंपळगाव, येवला, माळेगाव, मुसळगाव, पाडळी आदी.

मनमाड शहराच्या विकासाचा आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मनमाड एमआयडीसी प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. या 'एमआयडीसी'मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
सुहास कांदे, आमदार.
SCROLL FOR NEXT