नाशिक : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ५० वर्षांनंतर कला पदविका पात्रता निकष व शैक्षणिक कालावधी यात महत्त्वपूर्ण बदल केला. हे सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. जे पूर्वीच करायला हवे होते.
निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्यात स्पष्टता नाही. पदविकाधारकांना पदवीच्या कोणत्या वर्षात थेट प्रवेश मिळणार, ते 'मास्टर्स'ला प्रवेश घेऊ शकतील का? या आणि अन्य बाबतीत स्पष्टता सरकारने करावी अशा प्रतिक्रिया कला क्षेत्रातील अभ्यासकांनी दिल्या आहेत.
ललित कलेत महत्त्वपूर्ण असलेल्या कला पदविका अभ्यासक्रम उपयुक्त शिक्षणक्रम आहे. त्याचे संचलन कला संचालनालयामार्फत होत असे. आता कलामहामंडळाद्वारे होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून या शिक्षणक्रमाची पात्रता निकष आणि कालवधीत तसूभर बदल केला गेला नव्हता. त्यामुळे जीडी आर्ट या डिप्लोमा शिक्षणक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घसरण झाली. पदविका शिक्षणक्रम 'बॅचलर इन फाइन आर्ट' या पदवीइतका समकक्ष मानला जातो. मात्र, तो पूर्ण केल्यानंतर 'मास्टर डिग्री'ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १ वर्षाचा सेतू शिक्षणक्रम पूर्ण करावा लागतो. यात विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जात असे आणि केंद्रीय सरकारी शाळांमध्ये कलाशिक्षक पदासाठी ही पदवी ग्राह्य धरली जात नव्हती. आता या अभ्यासक्रमातील पात्रता आणि कालवधी बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर पदवीच्या कुठल्या वर्गात थेट प्रवेश मिळणार आहे, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही संभ्रम आहे.
नवीन निर्णय चांगला आहे. मात्र अभियांत्रिकी तंत्रनिकेतन पदविकाप्रमाणेच कलामंडळाकडून याबाबत स्पष्टता द्यायला हवी. असे डिप्लोमाधारक पदवी (बीएफए) किंवा एमएफएला थेट कोणत्या वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरतील याची स्पष्टता निर्णयात नाही.- प्रा. डॉ. मिलिंद ढोबळे, अधिष्ठाता, एमआयटी, स्कूल ऑफ फाइन आर्ट, पुणे
कोट शासनाने पदविका कोर्सचा कालावधी ३ वर्षांचा केला. आता विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करायची असल्यास, कलामंडळाने 'बीएफए'च्या थेट दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश द्यावा, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल.प्रा. संजय बागूल, ज्येष्ठ चित्रकार, अभ्यासक.
महाराष्ट्र कला मंडळांतर्गत बीएफए आणि जीडी आर्ट (पदविका) शिक्षणक्रम येतात. हा कोर्स केल्यानंतरही 'मास्टर्स'ला प्रवेश घेण्यासाठी १ वर्षाचा सेतू अभ्यासक्रम करावा लागतो. तो सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही.वैभव कुंभार, विद्यार्थी
दै. 'पुढारी'च्या वृत्ताची दखल ललित कला शिक्षणात जीडी आर्ट हा पदविका शिक्षणक्रम शिकवला जातो. त्या अंतर्गत चित्र आणि शिल्पकलेचे शिक्षण दिले जाते. पदविका कोर्सलाच डिग्री कोर्स करावा अथवा असा डिप्लोमा झाल्यानंतर थेट मास्टर शिक्षणक्रमास प्रवेश मिळावा. जीडी आर्ट डिप्लोमाप्राप्त विद्यार्थ्यांची विशिष्ट परीक्षा घेऊन त्यानंतर त्याचे रूपांतर पदवी (बीएफए) मध्ये करावे, अशीही मागणी मध्यंतरी केली जात होती. दै. 'पुढारी'ने यासंदर्भात दि. २६ मार्च २०२५ रोजी वृत प्रसिद्ध करून या शिक्षणक्रमातील समस्या, अडचणींना वाचा फोडली होती.