लासलगाव : ४० दिवसांत दामदुप्पट योजना राबवत कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सूत्रधार, संशयित सतीश काळेला निफाड न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर सहआरोपी योगेश काळेकडे पासपोर्ट असल्याने त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. (Damduppat Scheme Lasalgaon)
अल्पावधीत पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून लासलगावसह परराज्यातही मोठ्या प्रमाणात काळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा घेत गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०० कोटींहून अधिक रक्कम काळेच्या ज्वेलर्स प्रायव्हेट कंपनीने संकलित केल्याची चर्चा आहे.
सोमनाथ गांगुर्डे (रा. टाकळी विंचूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश पोपटराव काळे, योगेश परशराम काळे (दोघे रा. टाकळी विं.) व त्यांच्या साथीदारांविरुद्ध लासलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. संशयित सतीश काळे हा दुसऱ्या प्रकरणात धाराशिव पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे हस्तांतरण करण्यात आले. गुरुवारी दुपारी त्याला निफाड न्यायालयात हजर केले असता सहायक जिल्हा सरकारी वकील एस. पी. बंगले यांनी युक्तिवाद केला. गुंतवणुकीतील मोठी रक्कम कुठे गेली, यात अजून कोणाचा सहभाग आहे याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. पवार यांनी १७ ऑक्टोबरपर्यंत संशयिताला पोलिस कोठडी सुनावली.