नाशिक

Nashik leopard attack news: लहवितमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; तरुण थोडक्यात बचावला

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून उपाययोजना करण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प: नाशिक परिसरातील लहवित क्षेत्रात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. शनिवारी (दि.१० जानेवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका धावत्या मोटरसायकलवर बिबट्याने झडप घातली. या भीषण हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेला युवक जखमी झाला असून, सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शान रतन आहेर (वय २०) हा तरुण आपल्या मित्रासोबत शनिवारी (दि.10 जानेवारी) रात्री १०:३० च्या सुमारास लहवित परिसरातून दुचाकीवरून जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक धावत्या दुचाकीवर हल्ला केला. बिबट्याने मारलेल्या पंज्यामुळे शान याच्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तरुणावर तातडीने उपचार

हल्ल्यानंतर जखमी शानला तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक उपचार केले. सुदैवाने, जखम गंभीर नसल्याने आणि प्रकृती स्थिर असल्याने त्याला आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वनविभागाची धाव; पिंजरा तैनात

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून परिसरात तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत जनजागृती सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT