Tree Cutting Pudhari
नाशिक

Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत वृक्षतोडीचा वाद

Nashik Kumbh Mela 2027 | शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना, दुसरीकडे वृक्षतोडीच्या घटनांनी पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना, दुसरीकडे वृक्षतोडीच्या घटनांनी पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विविध विकासकामे सुरू असून, त्यासाठी अनेक ठिकाणी झाडे तोडली जात आहेत.

शहरातील गंगापूर रोड, त्र्यंबक रोड आणि तपोवन परिसरात वृक्षतोड करण्यात आली. विशेषतः शेकडो वर्षांपूर्वीची झाडे आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहराचा हरित पट्टा कमी झाल्यास तापमान वाढ, प्रदूषण आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

शहराचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. शेकडो वर्षापूर्वीची झाडे तोडली जात आहेत. मनपाकडे तांत्रिक सल्लागार नाही. झाडांमुळे वाहतूक कोंडी होत नाही. सरकारी सलग सुट्यांचा योग पाहून गंगापूर रोडवरील झाडे तोडण्यात आली, जेणेकरून न्यायालयीन प्रक्रियेला उशीर होईल. मनपाने सर्वांसमक्ष भूमिका मांडावी. महापौर उद्योजकांकडून बोलतात, मात्र जनतेकडे लक्ष देत नाही. कुंभमेळा १२ वर्षांनी येतो, त्यामुळे पूर्वीपासून नियोजन का केले नाही?
- अंकुश मगजी, पर्यावरणप्रेमी
पर्यावरणस्नेहींच्या विरोधामुळे थोडी झाडे टिकली आहेत, नगरसेवक शांत आहेत, उद्योगपतींना समोर आणून वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न मनपा करत आहे. आर्थिक राजकारणामागे मात्र बोलविता धनी कोणी दुसराच आहे. उद्योगपतींनी नाशिककर म्हणून दातृत्व दाखवावे. ब्रिटिशकाळापासून नाशिक हे थंड हवेचे ठिकाण नैसर्गिक संपदेमुळेच गणले जाते. सर्व गोष्टींचा पाया हा वृक्ष आहे, त्यामुळे नुसता कोरडा विकास नको.
रोहन देशपांडे, पर्यावरणप्रेमी
झाडांभोवती आळी करा, या न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यास मनपा असमर्थता दर्शवत आहे. झाडांभोवती वाहतूक बेट केल्याने अपघातांची संख्या कमी होईल, झाडांचे संरक्षण होऊन वायू प्रदूषण कमी होईल. शहराचे सौंदर्याकरण वाढण्यास मदतच होणार आहे. मनपाने न्यायालयीन आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
-जसबीरसिंग, पर्यावरणप्रेमी
विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. नाशिककरांना लुटणारे जर पर्यावरणप्रेमींना गुन्हेगार म्हणत असतील, तर हे नाशिककरांचे दर्दैव आहे.
निशिकांत पगारे, पर्यावरणस्नेही.
पर्यावरण हा विषय फक्त एका शहराचा नाही, तर जगाचा आहे. या संदर्भात कायदे आहेत. विकास व कुंभाला कुणाचाही विरोध नाही. हा कुंभ हरित व्हावा. विकास, रस्ते बांधणी महत्त्वाचे असले, तरी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी करा म्हणणाऱ्यांना नाशिकविरोधी म्हणणे सर्वंकष चुकीचे आहे.
-कॉम्रेड राजू देसले, पर्यावरणप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT