सिन्नर (नाशिक) : नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा तसेच आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कोळपेवाडी ते देवपूर रस्त्यातील शिंदेवाडी फाटा ते शहा सबस्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्याचे टेंडर निघून कार्यारंभ आदेश निघाले. साइडपट्ट्यांचे काम सोडून प्रत्यक्षात इतर काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा रस्ता पंचाळेहून पुढे निमगाव फाटा येथून हिवरगाव - सायखेडा मार्गे नाशिक शहरात जाण्यासाठी प्रमुख पर्यायी मार्ग असून, कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ या मार्गावरून होणार आहे. मात्र सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, रुंदीकरणासाठी करण्यात आलेले साइडपट्ट्याचे मजबुतीकरण उखडले आहे. पावसामुळे आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. संबंधित यंत्रणांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे
या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णवाहिका व मालवाहू वाहने ये-जा करतात. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे नजरेस पडत नसल्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे.