नाशिक : शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यादृष्टीने महापालिकेच्या ट्रॅफिक सेल अर्थात, वाहतूक कक्षाने २९ ऑन स्ट्रीट आणि सहा ऑफ स्ट्रीट वाहनतळ निश्चित केले असून, पुढील आठवडयात त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे.
या ३५ वाहनतळांवर तब्बल ४,८६५ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नाशिक शहराचा वाढता विस्तार पाहता वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. वाहनतळांअभावी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. मध्यंतरी द्वारका येथे उड्डाणपुलावर घडलेल्या भीषण अपघातानंतर जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक घेत वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी ऑनस्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट वाहनतळ सुरू करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शहरातील वाहनतळांच्या जागांचा सर्वे करत ठिकाणे निश्चित केली होती. तसेच एआरअंतर्गत महापालिकेच्या जागेवर विकासकांनी उभारलेली वाहनतळे संबंधीत बिल्डरांच्याच ताब्यात असल्याने संबंधीत चार वाहनतळे देखील आता महापालिकेने ताब्यात घेतली असून, त्यानुसार मनपाच्या वाहतूक विभागाने आराखडा तयार केला आहे. यात दुचाकीसाठी पाच, चार चाकीसाठी १० रूपये तर मोठया वाहनांसाठी २० रुपयांची आकारणी होऊ शकते. एका तासापेक्षा अधिक काळ वाहन उभे राहिल्यास त्यासाठी किती शुल्क आकारायचे याबाबत निर्णय बाकी आहे.
वाहनतळांचा संपूर्ण आराखडा तयार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वाहन पार्किंग शुल्कातून महापालिकेला वार्षिक दीड ते दोन कोटी रूपयांचा महसूल अपेक्षित आहे.प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा