नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध रस्ते तसेच आरक्षणांच्या भूसंपादनासाठी विशेष टीडीआर देण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासासाठी खासगी अभियंते, वास्तुविशारदांचे तज्ज्ञ सल्लागार पॅनल नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. प्रत्येक प्रकरणासाठी पॅनलवरील अभियंते, वास्तुविशारदांना 'जीएसटी'सह ५९ हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहेत.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामध्ये रस्ते रुंदीकरण व नव्या रस्त्यांसाठी आवश्यक जागेच्या संपादनाचा विषय कळीचा ठरत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, हा आर्थिक भार कमी करण्यासाठी हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात 'टीडीआर'च्या माध्यमातून भूसंपादनाचा विचार केला जात आहे. थेट भरपाई देण्याऐवजी मालकांना टीडीआर देऊन जागा मिळविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिल्लक कालावधी लक्षात घेता, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे विशिष्ट तातडीची बाब म्हणून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी खासगी अभियंते, वास्तुविशारदांचे पॅनल तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
---
टीडीआर प्रस्तावांचा अनुभव आवश्यक
या पॅनलवर नियुक्तीसाठी संबंधित खासगी अभियंता व वास्तुविशारदाकडे किमान ५० टीडीआर प्रस्ताव तयार केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी, वास्तुविशारद पदवीसह सात वर्षे व स्थापत्य अभियांत्रिकी पदविका पात्रतेसहा 10 वर्षे कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. जाहिरातीद्वारे अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मुलाखती घेऊन ही नियुक्ती केली जाणार आहे.
--00--
-------०--------