Nashik Ring Road  
नाशिक

Nashik News | कुंभमेळा बाह्यरिंग रोडमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा, मोबदल्याबाबत सकारात्मक भूमिका

Nashik News | व्यवस्थापकीय संचालक दीक्षित; दाखला, शासकीय नोकरी देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुंभमेळा बाह्यरिंग रोडमुळे बाधित क्षेत्रात येणारे शेतातील घरे, विहिरी व जलस्रोत बाधित होत असल्यास अलाइनमेंटमध्ये गरजेनुसार किरकोळ बदल करून ते वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जे शेतकरी बाधित होतील, त्यांना योग्य व वाढीव मोबदला देण्याबाबत सकारात्मक भूमिका प्रशासन घेईल, अशी ग्वाही पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शेतकऱ्यांचा बैठकीत दिली.

कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित बाह्य परिक्रमा मार्गासाठी भू-संपादन करावी लागणाऱ्या जमिनीसाठी बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

तसेच बाधित होणाऱ्या २५ गावांमधील प्रातिनिधिक शेतकरी उपस्थित होते. तसेच आमदार सरोज अहिरे याही उपस्थित होत्या. प्रशासनाने यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यात शेतकऱ्यांनी सांगतिले की, बाह्य परिक्रमा मार्गाला आमचा विरोध नाही. मात्र या मार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत.

काही शेतकऱ्यांकडे अल्प शेती शिल्लक राहून, ते अल्पभूधारक होणार आहेत. तसेच शेतातील बंगले, विहिरी कूपनलिका बाधित होत आहेत. जलस्रोत नसल्यावर शेतकरी काय करतील तसेच गावाला पाणीपुरवठा करणारे बोअरवेल, स्मशानभूमी बाधित होत आहेत. तर शेतकऱ्यांनी कसे जगावे, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे अलाइनमेंटमध्ये बदल करण्याची मागणी केली.

काही शेतकऱ्यांनी जमिनीला योग्य मोबदला मिळावा, प्रकल्पग्रस्ताचा दाखला द्यावा, शासकीय नोकरी द्यावी अशीही मागणी केली. विहितगाव येथील इनाम जमिनी प्रश्नावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बाधित शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले.

तसेच अरिंगळे मळा परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या, रिंगरोडमुळे शेतातील घरे, विहिरी व जलस्रोत बाधित होत असल्यास अलाइनमेंटमध्ये गरजेनुसार किरकोळ बदल करून ते वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच कमीत कमी शेतकरी बाधित होतील, योग्य व वाढीव मोबदला मिळावा, याबाबतही ठोस चर्चा झाली. यावेळी ज्या-ज्या गावांमध्ये शासकीय गट उपलब्ध आहेत, त्या गट जमिनींचा जास्तीत जास्त वापर करून खासगी शेतजमिनीवरील परिणाम कमी करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार सरोज अहिरे यांनी केली.

बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले गेल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य अभियंता रनजीत हांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिक्रमा मार्ग 'समृद्धी'ला जोडण्याची मागणी

यावेळी काही शेतकऱ्यांनी संबधित परिक्रमा मार्ग हा समृद्धी महामार्गाला जोडावा, काही वन विभागाची जमीन, तर काही शासकीय जमिनीवरून मार्ग नेता येईल म्हणजे काही शेतजमिनी वाचू शकतील. मातोरी ते मुंगासरे या मार्गावर शेतकऱ्यांचे १८ बंगले, १४ विहिरी व पाच बोअरवेल बाधित होणार आहेत. त्यासाठी वेगळा मार्ग निवडावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT