नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सिटीलिंककडून मोफत प्रवासी सेवा पुरविली जाणार आहे. अर्थात यासाठी बस ऑपरेटर्सना अदा कराव्या लागणाऱ्या 4.57 कोटींच्या मोबदल्याची शासनाकडून मागणी केली जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळातर्फे विभागीय महसूल आयुक्तांना सिंहस्थ आराखड्यांतर्गत सादर करण्यात आला आहे.
येत्या २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यानिमित्त लाखो साधू-महंत व कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. साधू-महंत व भाविकांना महापालिकेच्या माध्यमातून विविध पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. महापालिकेबरोबरच जिल्हा प्रशासन, शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, महावितरण, पर्यटन, पोलिस, जिल्हा परिषद, टपाल आदी विभागांवरही विविध सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना बस प्रवासी सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाबरोबरच नाशिक शहरात नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंककडे असणार आहे. सिंहस्थ काळात शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना बाह्य वाहनतळावर थांबविले जाणार असून, तेथून शहरातील अंतर्गत वाहनतळापर्यंत भाविकांना सिटीलिंकच्या बसेसमधून प्रवासी सेवा पुरविली जाणार आहे. सिंहस्थातील तिन्ही पर्वणीकाळात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे या काळात सिटीलिंकची सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची योजना आहे. त्यासाठी विभागीय महसूल आयुक्तांच्या निर्देशांनुसार सिटीलिंकने प्रस्ताव सादर केला आहे. खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सिटीलिंकची सेवा पुरविली जात असल्यामुळे प्रवासी सेवेपोटी सिटीलिंकडून ऑपरेटर्सना देयक अदा केले जाते. त्यामुळे तिन्ही सिंहस्थ पर्वणींच्या नऊ दिवसांतील 4.57 कोटींचे देयक ऑपरेटर्सना अदा करण्यासाठी शासनाकडून या रकमेची मागणी केली जाणार आहे.
सिटीलिंकच्या माध्यमातून शहरात 200 सीएनजी, 50 डिझेल बसेस सध्या चालविल्या जात आहेत. 100 इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रियादेखील सुरू झाली असून, पुढील वर्षात नवीन ई-बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे सिटीलिंककडील बसेसची संख्या 300 होणार आहे. या 300 बसेसमार्फत सिंहस्थकाळात भाविकांना प्रवासी सेवा पुरविली जाणार आहे.