Arrested Pudhari
नाशिक

Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने 3 कोटींचा गंडा; बनावट वर्कऑर्डर प्रकरणात दोघांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी!

Nashik Kumbh Mela | कुंभमेळा प्राधिकरणाची बनावट कागदपत्रे अन् शासनाची राजमुद्रा! नाशिकमध्ये भामट्यांचा पर्दाफाश.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांची वर्कऑर्डर देत ३ कोटींच्या फसवणूक प्रकरणी तनय अनंत महाजन आणि नरेंद्र तोताराम महाजन यांना पोलिसांनी अटक केली होती. दोघांना नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयितांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचा बनावट टेंडर नोटीस क्र., शासनाची राजमुद्रा असलेली कागदपत्रे तसेच बनावट वर्कऑर्डर दाखवून फिर्यादीचा विश्वास मिळवला.

हाउस कीपिंगसह विविध कामांचे टेंडर मिळवून देण्याचे सांगत टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यात आले. तपासात ही रक्कम संशयितांच्या बँक खात्यांवर जमा झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात कोणतेही टेंडर किंवा काम मिळाले नाही. नाशिक कुंभमेळ्यासाठीच्या विकासकामांचे बजेट आणि टेंडर प्रक्रियेशी संबंधित अधिकृत स्वरूपाची कागदपत्रे दाखवून संशयितांनी मोठ्या प्रकल्पांत काम मिळणार असल्याचे भासवले.


संगणकाच्या माध्यमातून हुबेहूब वर्कऑर्डर तयार करण्यात आल्या. त्यावर शासनाची राजमुद्रा, टेंडर क्रमांक आणि इतर तपशील वापरण्यात आल्याने कागदपत्रे खरी असल्याचा फिर्यादीचा समज झाला. वर्कऑर्डर मिळवून देणे आणि टेंडर प्रक्रियेतील विविध खर्चाच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यांत रक्कम घेण्यात आली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहार, मोबाइल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. गुन्हे शाखेने जामनेर परिसरात कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले होते.

चौकशी दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करण्याची पद्धत, आर्थिक व्यवहार तसेच टेंडरच्या नावाखाली करण्यात आलेल्या व्यवहाराबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. संशयितांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू असून फसवणुकीची रक्कम नेमकी कुठे वळवली याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT