नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या 2025-2026 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात सुमारे सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. लेखा विभागाकडून अंदाजपत्रकीय आकडेमोड सुरू असून, महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी अंदाजपत्रकातील जमा- खर्चाचा आढावा घेत सिंहस्थ कामांच्या तयारीच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत
महापालिकेच्या 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या सुधारीत व 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या नियमित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची तयारी लेखा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत अंदाजपत्रकीय तयारीचा आढावा घेण्यात आला. 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी 2603.49 कोटींचे अंदाजपत्रक मंजुर करण्यात आले होते. यात जीएसटीच्या माध्यमातून 1,472 घरपट्टीतून 241 कोटी रुपये, नगर नियोजन विभागाकडून 208 कोटी, पाणीपट्टीतून 73 कोटी, मिळकत विभागाकडून 224 कोटी, नळजोडणी व मिळकत विभागाकडून 100 कोटी, शासन अनुदानातून 7.5 कोटींचा महसुल मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतू शासनाकडून प्राप्त जीएसटी अनुदान वगळता अन्य स्रोतांकडून प्रस्तावित महसुलाचे आकडे गाठणे प्रशासनाला शक्य होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पन्नातील जमा बाजुत तुट येणार असून सुधारीत अंदाजपत्रकात त्याचे चित्र उमटणार आहे.
दरम्यान, 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सिंहस्थासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधीची प्रतिक्षा असली तरी दीर्घ मुदतीच्या सिंहस्थ कामांना आतापासूनच सुरूवात करावी लागणार आहे. त्यादृष्टीने सिंहस्थकामांसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून सुमारे सहाशे कोटींची तरतूद करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
सिंहस्थ कामांसाठी तरतूद केल्यास शहरातील अन्य विकास कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांसह शहरातील अन्य कामांसाठी तरतूदीची सांगड अंदाजपत्रकात घालावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. यासाठी निधीच्या उपलब्धतेसाठी महसुल वृद्धीकडेही लक्ष दिले जात असून अंदाजपत्रकाच्या माध्यमातून विकास शुल्कासह अन्य करांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ कामे तसेच अन्य विकास कामांसाठी निधीची सांगड घातली जाईल.दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका, नाशिक.