नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत प्रस्तावित पायाभूत कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी, नाशिक महामार्ग येथील बसस्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणासह ४५०० बसेस तैनात करण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी निवृत्त व अनुभवी कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्तीबाबतही चर्चा करण्यात आली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी करण्यात येणाऱ्या परिवहन नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे स्मार्ट सिटी मिशन कार्यालयात आढावा बैठक पार पडली. ही बैठक कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत परिवहन पायाभूत सुविधा, बस संचालन, मनुष्यबळ नियोजन तसेच तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा करण्यात आली. बैठकीस परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नितीन मैंद, महाव्यवस्थापक दिनेश महाजन, उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस, प्रादेशिक व्यवस्थापक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक किरण भोसले, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, कनिष्ठ अभियंता चैताली भुसारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत प्रस्तावित पायाभूत कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी, नाशिक महामार्ग या ठिकाणांवरील एसटी बसस्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहे. सप्तशृंगगड येथे भूसंपादन प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी अटीसह निविदा काढण्याच्या शक्यतेवरही चर्चा करण्यात आली. कुंभमेळा कालावधीत बस संचालन योजनेच्या आढाव्यात ४,५०० बसेस तैनात करण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
प्रत्येक विभागात स्वतंत्र सिंहस्थ कुंभमेळा कक्ष स्थापन करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना स्थानिक पातळीवर कुंभमेळा कक्ष तत्काळ कार्यान्वित करीत कुंभमेळा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास तसेच विभागीय आराखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यांचा अनुभव लक्षात घेऊन पूर्वी कुंभमेळ्यात कार्य केलेल्या निवृत्त राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मानधन अथवा करार पद्धतीने नियमानुसार सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. कुंभमेळा कालावधीत वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रवासी मागणी विश्लेषण व मार्ग नकाशा तयार करण्याच्या शक्यतांच्या अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाह्य पार्किंगस्थळे तसेच कसबे सुकेणे, ओढा, खेरवाडी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी रेल्वेस्थानक प्रमुख ठिकाणांहून त्र्यंबकेश्वर व अंतर्गत पार्किंगपर्यंत भाविकांची वाहतूक करतील. बस जागा, मार्गनियोजन व सामग्री पुरवठा व्यवस्थापन याबाबतचे सूक्ष्म नियोजन एसटी महामंडळाच्या केंद्रीय स्तरावर करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. मनुष्यबळ नियोजनाबाबत चर्चा करताना महामंडळाचे यांत्रिक व प्रशासकीय पर्यवेक्षण अधिकारी कुंभमेळ्याच्या सहा महिने अगोदर जानेवारी २०२७ पासून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भौगोलिक परिस्थिती व कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण व भूमिकानिश्चिती आधीच करण्यात येईल. बदली झाल्यासाही नियुक्तीचे सातत्य राखण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.