Nashik Kumbh Mela 2026 
नाशिक

Nashik Kumbh Mela 2027 | बाह्य रिंगरोड उभारणीसाठी 3954 कोटींना प्रशासकीय मान्यता

Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांना गती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने नाशिक शहरातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी ६९. १५ कि.मी. लांबीच्या नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात बाह्य रिंगरोडच्या नागरी बांधकाम कामांसाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिली आहे.

यासह सिंहस्थ काळात विविध उपक्रम, मोहिमा व सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावी आणि सुसंगत पद्धतीने पोहोचण्यासाठी योग्य संवाद, सर्जनशील मल्टिमीडिया निर्मिती आणि डिजिटल माध्यमांचा समन्वित वापर करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील बैठकीस उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, या प्रकल्पासाठी जमीन संपादनास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तावित नाशिक रिंगरोडची एकूण लांबी ६९.१५ कि.मी. असून, डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग ६०) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडली जाणार आहे.

या चार ते सहा पदरी मार्गात पाच मोठे पूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ वाहन अंडरपास तसेच सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा मार्ग चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्य महामार्गांना जोडणारा असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच सिंहस्थ काळात अखंड वाहतूक सुलभ करण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपवनसंरक्षक (पूर्व) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा,

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन, नियोजन विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील, योगेंद्र चौधरी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

७ कोटींचा ध्वजस्तंभ, यात्रेकरू सुविधेसाठी १९० कोटी

याशिवाय यात्रेकरू सुविधा, संपर्क व्यवस्था व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामांसाठीही १९० कोटी रुपयांहून अधिक निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. नाशिक येथील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारण्यासाठी ७ कोटी ९ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी पर्वतावरील लहान व मोठी प्रदक्षिणा मार्ग विकास तसेच अंजनेरी येथे इको टुरिझम विकासासाठी २३ कोटी १२ लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली.

१०.२४ कोटींचा सर्वंकष वाहतूक आराखडा

टाकळी परिसरातील गोदावरी-नंदिनी नदी संगमाच्या उजव्या काठावर ३०० मीटर घाट बांधण्यासाठी ४४ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून, यामुळे नदीकाठावरील सुविधा मजबूत होणार आहेत. पंचवटी परिसरातील कर्मा हाइट्स ते तपोवन एसटीपी, सर्व्हे क्रमांक ३५७ व नांद गावापर्यंतच्या रस्ते विकासासाठी २० कोटी २२ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सिंहस्थ २०२७ साठी वाहतूक नियोजन वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी आयआयएम नागपूरमार्फत एकात्मिक गतिशीलता आराखडा (इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यासाठी १० कोटी २४ लक्ष रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT