नाशिक : यंदा मे महिन्यातच अवकाळीची हजेरी लावलेली असतानाच त्यानंतर मान्सून वेळेत दाखल होत असल्याने खरीप हंगामात पावसाची कृपादृष्टी चांगली दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतानाच दुसरीकडे मात्र, रासायनिक खते, बियाणांच्या किमतीत वाढ झाली आहे. 100 ते 270 रुपयांपर्यंत प्रतिगोणी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी खर्चात वाढ होणार आहे. खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
खरीप हंगाम पेरणीस जून महिन्यात सुरुवात होईल. शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीस शेतकऱ्यांकडून वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात भात, मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, बाजरी, मूग, मठ आदींची पेरणी होते. त्यासाठी बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध असला, तरी मका बियाणाच्या किमतीत प्रतिकिलो 100 रुपयांची वाढ झाली आहे. रासायनिक खते शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी विभागाचे नियोजन आहे. खतांचे लिंकिंग होऊ नये, यासाठी कृषी विभाग आतापासून कामाला लागला आहे. दुसरीकडे मात्र, यूरिया वगळता रासायनिक खतेही महागली आहेत. प्रतिगोणी 100 ते २७० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
रासायनिक खतांची विक्री ही कंपनीने निश्चित केलेल्या दरानेच करणे बंधनकारक आहे. परंतु यात वाहतूक खर्च व हमाली समाविष्ट नाही. त्यामुळे हा खर्च विक्रेत्यांना करावा लागतो. परिणामी, कंपनीने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने खतांची विक्री होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
अवकाळीने आधीच नुकसान झाले आहे. यात खरिपाच्या पेरण्या करायच्या आहेत. या परिस्थितीत खतांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. त्यासाठी शासनाने खतांच्या किमती निश्चित करून द्याव्यात.यशवंत ढिकले, शेतकरी, नाशिक