Kushavartkund, Trimbakeshwar, Nashik
कुशावर्तकुंड, त्र्यंबकेश्वर, नाशिक file photo
नाशिक

नाशिक : अर्थसंकल्पात कुंभनगरी त्र्यंबकला ठेंगा

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : अर्थसंकल्पात सिंहस्थ कुंभमेळ्याची नगरी असलेल्या त्र्यंबकेश्वरचा राज्य शासनाला विसर पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साडेनऊ वर्षांपूर्वी केलेल्या घोषणेचा विसर पडल्याने आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष असलेले स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज यांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक पाहता संपूर्ण विश्वात कुंभमेळ्याचे आकर्षण राहिले आहे. देशभरात चार ठिकाणी कुंभमेळा होतो. त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य आहे. त्र्यंबकेश्वर येथे शैव आणि नाशिक येथे वैष्णव साधू स्नान करतात. त्र्यंबकेश्वर येथे दहा शैव साधूंचे आखाडे आहेत. नागा साधूचे स्नान आणि शाही मिरवणुका त्र्यंबकेश्वर येथे असतात. देश- विदेशातील भाविक या शाहीस्नानाच्या दरम्यान हजेरी लावतात. आगामी सिंहस्थ २०२६-२७ चा प्रारंभ ऑगस्ट २०२६ मध्ये ध्वजापवनि होत आहे. मात्र, शासनाला याचा विसर पडला आहे.

शुक्रवारी (दि.२८) सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची पूर्वतयारीसाठी एक रुपया देखील देण्यात आलेला नाही. याबाबतचा उल्लेखदेखील केलेला नाही. वास्तविक पाहता सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंहस्थ २०१५ दरम्यान मुख्यमंत्री होते. त्यांनी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी तत्कालीन मंत्रिमंडळातील सहकारी, शासन अधिकारी आणि साधू-महंत यांची एकत्रित बैठक घेतली होती. या बैकठीत त्यांनी सिंहस्थ नियोजन करण्यात घाईगडबड झाल्याचे नमूद केले. त्याच वेळेस त्यांनी सिंहस्थाचा ध्वज उतरवला जाईल त्याच वेळेला पुढील सिंहस्थाची तयारी सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले होते. तथापि, अवघ्या दोन वर्षांवर ध्वजारोहण आले असताना अद्याप सरकारी पातळीवर सामसूम परिस्थिती आहे. याबाबत त्र्यंबकवासीय आणि सर्व साधू-महंतांनी खेद व्यक्त केला आहे. मागच्या काही सिंहस्थाचा अनुभव पाहता शाही मिरवणुका सुरू होतात आणि रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम होत असते. दरवेळेस विकासकामांना पुरेसा अवधी मिळाला नसल्याची तक्रार होते. तसेच सिंहस्थ निधी परत जाण्याचे प्रकारदेखील घडतात. यावेळेस निदान तसे घडायला नको म्हणून आतापासून तयारी सुरू होण्याची आवश्यकता होती.

सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत शासनाने दुर्लक्ष केले आहे. अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. यावरून हे स्पष्ट झाले आहे. सरकार पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी महोत्सवांचे आयोजन करते. मात्र, हजारो वर्षांपासून भरणारा कुंभमेळा दुर्लक्षित केला जात आहे.
महंत शंकरानंद सरस्वती महाराज, कोषाध्यक्ष, आखाडा परिषद, नाशिक.
SCROLL FOR NEXT