पंचवटी (नाशिक) : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या कणखर भुमिकेचे पडसाद पाडव्यानिमित्त बुधवारी सायंकाळी पंचवटीत निघालेल्या रेड्यांच्या मिरवणुकीत उमटले. पोलिसांनी सराईत गुन्हेगार व समर्थकांसह वदवून घेतलेली 'नाशिक जिल्हा... कायद्याचा बालेकिल्ला' ही घोषणा पाठीवर रंगवलेले रेडे विशेष आकर्षण ठरले. याची उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा झाली.
रेड्यांच्या पाठीवर विविध घोषणा
दिवाळी पाडव्यानिमित्त पंचवटीतील विविध भागातून रेड्यांना सजवून मिरवणुकीद्वारे दिंडोरी रोडवरील बाजार समितीसमोर व पंचवटी कारंजा येथे असलेल्या श्री म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी आणले जातात. या मिरवणुकीतील रेड्यांच्या पाठीवर दरवर्षी विविध घोषणा रंगवलेल्या असतात. त्यात तत्कालीन ज्वलंत विषय तसेच सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. यंदा सर्वात चर्चेत असलेल्या 'नाशिक जिल्हा.... कायद्याचा बालेकिल्ला !' ही घोषणा अनेक रेड्यांच्या पाठीवर रंगवण्यात आलेली होती. यावेळी मोठया संख्येने दुग्ध व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.