नाशिक : शहरातील सडकछाप भाईंची मस्ती उतरविण्यासाठी नाशिक पोलिसांनी हाती घेतलेली मोहिम सध्या राज्यभर कौतुकाचा विषय ठरत आहे. आतापर्यंत नाशिक पोलिसांनी अनेक भाईंना वठवणीवर आणले असून, जे अद्यापही सुधारण्याच्या स्थितीत नाहीत, त्याच्यावर पोलिस बारिक लक्ष ठेवून आहेत. असेच सोशल मीडियावर कल्ला करीत व्हायरल झालेल्या दोघा भाईंना पोलिसांनी 'फराळ' दिल्याने ते देखील आता हात जोडून 'कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा देत आहेत.
दिवाळीच्या दिवशी (दि. २१) वैभव चोथे व सुमीत डोकफोडे या दोघांनी हर्ष वैश्य यांच्या घरासमोर दहशत निर्माण करण्यासाठी दुचाकीची तोडफोड केली होती. हे दोघेही हर्ष यांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फोडत होते. त्यांना हर्ष हटकले असता, दोघांनी घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली होती. तसेच शिविगाळ करीत, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना दिवाळीचा फराळ दिला. त्यामुळे दोघेही हात जोडून 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' या घोषणा देत असल्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरा व्हिडीओ भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत या सडकछाप भाईवरील भाईगिरीचे भूत उतरविल्याचा व्हिडीओ आता समोर येत आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये हा भाई, '११२ ला काल, मी घाबरत नाही' असे म्हणताना दिसतो. याशिवाय सीपी, डीसीपी यांना देखील मी घाबरत नसल्याचे तो म्हणताना दिसतो. एक वृद्ध महिला त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. मात्र, अशातही हा भाई अंगावर धावून येत, मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे दिसून येतो. या व्हिडीओनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांकडून दुसरा व्हिडीओ व्हायरल करीत, त्यात भाईच्या डोक्यावरील भाईगिरीचे भूत उतरविले जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय हा भाई हात जोडून 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' अशी घोषणाही देत आहे. दरम्यान, पोलिसांकडून केल्या जात असलेल्या या धडक कारवाईचे नाशिककरांकडून मात्र स्वागत केले जात आहे.
काढ व्हिडीओ, टाक सोशल मीडियावर
सध्या कोणी दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याबाबतचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्यास, पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील आता 'काढ व्हिडीओ, टाक सोशल मीडियावर' असे करताना दिसून येत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होताना दिसून येत आहे. दुसरीकडे सडकछाप भाईंची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे.