नाशिक : काठे गल्ली येथील सातपीर बाबा दर्गाचे अतिक्रमण काढण्यावरून मंगळवारी, दि. १६ एप्रिलला मध्यरात्री पखाल रोड येथे दंगल झाली होती. सखोल तपासात काठेगल्ली येथून ४ एप्रिल रोजी झालेल्या व्यावसायिकाचे अपहरण करत त्याच्याकडून खंडणी उकळली. त्यानंतर त्या पैशांचा वापर दंगल घडवण्यासाठी व दंगलीनंतर अटक झालेल्या संशयितांच्या जामीनासाठी करण्याचा बेत गुन्हेगारांचा होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ही दंगल पुर्वनियोजीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दर्गाचे अतिक्रमण काढण्यावरून पखाल रोडवर १६ एप्रिलला सुमारे दीड हजार नागरिकांच्या जमावाने पोलिसांवर प्राणघातक हल्ला करीत दगडफेक केली होती. पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवला. त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड केली. सखोल तपासात या दंगलीत राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांसह सराईत गुन्हेगारांचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणी ५७ जणांना अटक केली आहे. त्यात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण उर्फ छाेटा पठाण यालाही अटक केली. त्याने दंगलीच्या वेळी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी संशयितांकडे केलेल्या तपासात काठे गल्ली येथून ४ एप्रिलला व्यावसायिक निखील दर्याणी यांचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी निखील यांच्या भावाकडून १५ लाख रुपयांची खंडणी घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत अपहरणकर्त्यांना अटक केली, तर मुख्य संशयित शाकिर पठाण उर्फ मोठा पठाण हा फरार झाला. समीर पठाण याच्याकडील चौकशीत या अपहरणातून घेतलेली खंडणीचे पैसे दंगलीसाठी वापरण्याचा कट रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित शाकीर पठाण याचाही तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या अपहरणातील संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून दोन लाख ८८ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. मात्र, उर्वरित रक्कम न मिळाल्याने या पैशांचा वापर कोणी व कुठे केला याचा तपास पोलिस करीत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तारखेला मनपाच्या वतीने दर्गाला अतिक्रमणाची नोटीस देण्यात आली. त्यानंतर २ एप्रिलला दंगेखाेरांनी गुप्त बैठक घेत कारवाईस विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दंगलीसाठी आणि दंगलीनंतर अटक झालेल्या तरुणांच्या जामीनासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी पठाणने व्यावसायिकाचे अपहरण करीत खंडणी घेतली. त्यानंतर सोशल मीडियावरून जमावास आवाहन करीत १६ एप्रिलला मध्यरात्री दंगल घडवण्यात आली. दंगलीच्या आधी परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे दंगल पुर्वनियोजीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दंगलीत सहभागी झालेल्यांनी त्यांचे मोबाइल घरीच ठेवल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पखाल रोडवरील दंगल प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सहभागही उघड झाला आहे. त्यापैकी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारांच्या साथीदारांनी व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण केले होते. या खंडणीतील पैशांचा वापर गुन्हेगारांनी दंगलीसाठी केल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.