कसबे सुकेणे : मुंबई-आग्रा महामार्गालगत वसलेल्या औद्योगिकदृष्ट्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ओझरलगतचा कसबे सुकेणे व आजूबाजूचा परिसर सध्या वाढत्या गुन्हेगारीने धास्तावला आहे. अपहरण, घरफोड्या, मोबाइल व दुचाकी चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, पोलिस यंत्रणा अपुरी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, थेरगाव, दात्याणे, दिक्षी, जिव्हाळे आणि ओणे या गावांमध्ये महिलांच्या पोती ओढण्याचे प्रकार, बाजारातील गर्दीत मोबाइल चोरी तसेच दुचाकी चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही घटनांमध्ये थेट नागरिकांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या एकूणच गैरप्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या पोलिस ठाण्याकडे केवळ एकच व्हॅन उपलब्ध असून, तीदेखील बहुतांश वेळा व्हीआयपी किंवा विमानतळाशी संबंधित कामांमध्ये अडकलेली असते. याचा थेट परिणाम गावांतील गस्त आणि गुन्ह्याच्या तातडीच्या तपासावर होतो. तपासी अंमलदार कमी असल्यामुळे गुन्ह्यांचे वेळेत आणि परिणामकारक तपास होऊ शकत नाहीत. परिणामी, गुन्हेगारांना धास्ती उरत नाही.
ओझरसह सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्याला पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव गेल्या 10 वर्षांपासून सरकार दरबारी रखडलेला आहे. दर सहा महिन्यांनी अहवाल मागवून ‘कागदी घोडे’ नाचवले जातात. मात्र, प्रत्यक्ष कृती शून्य आहे. राज्य गृहखात्याने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
परिसरातील नागरिक, व्यापारी आणि पालकवर्ग सातत्याने पोलिसांची गरज व्यक्त करत आहेत. शाळा सुटल्यानंतर परिसरातील संशयास्पद हालचाली, बाजारात महिलांशी होणारे गैरवर्तन, चोर्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, चार पोलिस निरीक्षक, 60 कर्मचारी, ज्यात सहा अनुभवी तपासी अंमलदार, किमान दोन गस्ती वाहने, सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार करावा, अशी मागणी होत आहे.
ओझर पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील हद्द दहाव्या मैलापासून ते साकोरा फाट्यापर्यंत पसरलेली आहे. त्यात उपरोक्त गावांचादेखील समावेश आहे. एक लाखाच्या वर लोकसंख्या आणि त्यात उपनगरे व बाजारपेठा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेवर अतिरिक्त दबाव आहे. पण, सध्या फक्त दोन अधिकारी व 25 पोलिस कर्मचारी या संपूर्ण भागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
कसबे सुकेणेत शाळकरी मुलींच्या अपहरणाची घटना घडली. आरोपी पळून जात असताना नागरिकांनी त्यास पकडून ठेवले. पोलिस चौकी नावालाच आहे. ती कायमच बंद असते. पोलिस कर्मचारी उपस्थित नसतात अर्थात त्यांच्यावर कामाचा ताण असतो, आम्ही हे पण मान्य करतो. परंतु वरिष्ठांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून तातडीने आवश्यक पोलिस बळ उपलब्ध करून द्यायला हवे.अनुपमा जाधव, माजी उपसरपंच, कसबे सुकेणे
कसबे सुकेणे आणि परिसरामध्ये पोलिस यंत्रणा कमी पडतेय. वरिष्ठांकडे पोलिस कर्मचार्यांची मागणी केल्यास त्यांचे उत्तर अजब असते, ‘हे पोलिस स्टेशन नव्हे तर आउट पोस्ट आहे’.विश्वास भंडारे, राजकीय कार्यकर्तेे