कळवण : भादवण परिसरात केमिकल सोडून पसार होण्याच्या प्रयत्नातील टँकरला रोखताना ग्रामस्थ. Pudhari News Network
नाशिक

Nashik Kalwan News | केमिकलयुक्त द्रव्याची विल्हेवाट लावणारा टँकर पकडला

भादवणच्या शेतकऱ्यांची सतर्कता; दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कळवण (नाशिक) : कळवण तालुक्यात केमिकलयुक्त विषारी द्रव्य सोडण्याच्या प्रकारामागील गूढ लवकरच उघड होणार आहे. असेच द्रव्य शेतात टाकून पसार होण्याच्या प्रयत्नातील टँकरचालक आणि क्लीनर यांना भादवणमधील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले आहे. त्यांना कळवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भादवण परिसरात काही महिन्यांपासून विषारी केमिकल सोडण्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या. उग्रवासामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले होते. शिवाय, पाळीव जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या होत्या. जमीन नापिकी आणि भूजल प्रभावित होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले होते. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून मात्र कोणतीच चौकशी झाली नाही. यातच सोमवारी (दि. २१) पहाटे नंदू पवार यांना त्यांचे शेजारी प्रकाश नानाजी जाधव यांच्या शेतात एक टँकर उभा दिसला. त्यातून सोडण्यात येत असलेल्या केमिकलमुळे उग्र दर्प पसरून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. ही बाब त्यांनी तत्काळ जाधव यांना कळविली. जाधव जवळ येत असल्याचे पाहून टँकर घेऊन संशयितांनी धूम ठोकली. शिवारातील शेतकऱ्यांनी टँकरचा पाठलाग करीत त्यांना रोखले. टँकरचालकाला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांनी टँकरसहित चालक आणि क्लीनरला कळवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जाधव यांनी फिर्याद नोंदवली. संशयित टँकरचालक रामचरण शंकरलाल परमार (४२, रा. बडोली, इंदूर) आणि क्लीनर ईश्वर अंबाराम केवट (४०, रा. गौतमपूर, इंदूर, मध्य प्रदेश) यांच्यावर अटकेची कारवाई झाली. चौकशीत त्यांनी टँकरमालक पुणे येथील असल्याचे सांगितल्याचे कळते. पुढील तपास पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सखोल चौकशीकडे लक्ष

यापूर्वीही तालुक्यात केमिकलयुक्त द्रव लपून छपून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. हे केमिकल नेमके काय आहे, असा प्रकार करण्यामागील कारण काय? या प्रश्नांच्या उत्तराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय, या प्रकारामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT