नाशिक : ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवात रविवारी (दि. ६) भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. या वेळी नाशिककरांनी सहकुटूंब यात्रोत्सवात आनंद लुटला. गडकरी चौक ते मुंबई नाक्यापर्यंतचा परिसर गर्दीने अक्षरश: फुलुन गेला.
नवरात्रौत्सवात चौथी माळ आणि रविवारची सुट्टी असा दुहेरी योग जुळून आला. ग्रामदैवत कालिका मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. विशेष करुन महिलांची संख्या अधिक होती. दुपारी दहापर्यंत भाविकांचा ओघ कायम होता. दुपारच्या सुमारास काहीकाळ गर्दी कमी असली तरी सायंकाळनंतर हजारो भाविकांची पावले यात्रोत्सवाकडे वळली. त्यामुळे मुख्य रस्त्यापर्यंत रांग लागल्याने दर्शनासाठी नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले.
दरम्यान, मंदिर परिसरात दर्शन पार पडल्यानंतर नागरिकांनी यात्रोत्सवात फिरण्याचा आनंद घेतला. यावेळी बच्चेकंपनीने खेळणी तर महिलांनी घरगुती साहित्यासह ज्वेलरी खरेदीला पसंती दिली. तसेच यात्रेत खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय्यांनी रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरु होती. दरम्यान, अबालवृद्धांसह बच्चेकंपनीने यात्रेतील विविध पाळण्यांमध्येही बसण्याचा आनंद घेतला.
श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या. विशेष करून महिला भाविकांची गर्दी अधिक होती. यावेळी कालिका मातेच्या जयघोषाने अवघा मंदिर-परिसर दुमदुमून गेला. मंदिरात दुपारपासूनच मोठी गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.