नाशिक : एआय टूल्सच्या वापरामुळे कुणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत. उलट अधिकाऱ्यांची कार्यपद्धती अधिक सक्षम होण्यास त्याने मदतच होणार आहे. नजीकच्या काळात प्रत्येक क्षेत्रात 'एआय टूल्स'चा वापर वाढला असून, त्याकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. पराग रानडे यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने निमा सभागृहात 'डाटा एनॅलेटिक्स व एआय टूल्स फॉर एचआर' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, एचआरआयआर समितीचे चेअरमन हेमंत राख उपस्थित होते. डॉ. रानडे म्हणाले, 'डाटा एॅनालिटिक' या विषयाकडे एचआरने गांभीर्याने बघण्याची गरज आहे. डाटा म्हणजेच माहतीचे विश्लेषण योग्य पद्धतीने झाल्यास त्याचा कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होऊन उद्योगांची प्रगती होते. तसेच एआय टूल्सचा मनुष्यबळ विकास क्षेत्रात, नोकरी भरती प्रक्रिया, अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा, पेरोल तसेच विविध कार्यप्रणालीत प्रभावी वापर होऊ शकतो. त्यामुळे एआय टूल्सचा अभ्यास क्रमप्राप्त आहे. निमाचे एचआर व आय आर समितीचे अध्यक्ष हेमंत राख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रीकांत पाटील व आभार वैभव कुलकर्णी यांनी मानले.