नाशिक : नाशिकच्या आयटी पार्कचा प्रश्न अद्यापही अधांतरी असताना, आयटी क्षेत्रातील नामांकित 'केपजेमिनी' या फ्रेंच कंपनीने देशातील प्रख्यात 'डब्ल्यूएनएस' कंपनी अधिग्रहित केल्याने नाशिकच्या आयटी क्षेत्राला काहीसे बळ मिळाले आहे. 'डब्ल्यूएनएस' ची नाशिकमध्ये दोन केंद्र असून, लवकरच त्यांच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
केपजेमिनीने सुमारे २८ हजार कोटींमध्ये डब्ल्यूएनएस खरेदी केले असून, केपजेमिनीने या व्यवहाराची अधिकृत घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व एजेंटिक एआय क्षेत्रात (निर्णय घेण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता) जागतिक स्तरावर अव्वलस्थानी पोहोचण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला आहे. 'केपजेमिनी' ही आयटी क्षेत्रातील, तर 'डब्लूएनएस' ही बीपीओ व आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. 'केपजेमिनी'चा ब्रिटन, अमेरिकेत दबदबा असून, 'डब्ल्यूएनएस' कडे कोकाकोला, युनायटेड एअरलाइन्ससारखे मातब्बर ग्राहक आहेत. दोन्ही कंपन्यांची अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये असून, त्यांच्या एकत्रीकरणाने समूहाला मोठा आर्थिक फायदा होण्याचा अंदाज आहे.
सन १९९० मध्ये स्थापन झालेल्या 'डब्ल्यूएनएस' चे महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे व नाशिक अशा चार शहरांत प्रकल्प आहेत. नाशिकमध्ये कंपनीची शरणपूर रोड व वडाळा परिसर अशी दोन केंद्र असून, तेथे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी काम करतात. 'डब्ल्यूएनएस' ही बीपीओ-आयटी क्षेत्रातील नाशिकमधील सर्वांत मोठी कंपनी असून, ती हेल्थकेअर, शिपिंग, लॉजिस्टिक, हायटेक प्रोफेशनल सर्व्हिसेस, ट्रॅव्हल आदी क्षेत्रांत कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी उद्योजकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यास अद्यापही यश आले नाही. त्यामुळे 'केपजेमिनी'कडून झालेले हे अधिग्रहण नाशिकच्या आयटी पार्कला पूरक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
'केपजेमिनी'कडून यापूर्वी नाशिकमध्ये प्रकल्प उभारणीसाठी चाचपणी करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव कंपनी नाशिकमध्ये दाखल होऊ शकली नव्हती. आता तिने थेट 'डब्ल्यूएनएस' 'चेच अधिग्रहण केल्यानंतर 'डब्ल्यूएनएस' च्या नाशिकमधील दोन्ही केंद्रांना 'बूस्ट' मिळण्याची चिन्हे आहेत. 'केपजेमिनी'कडून 'आउटसोर्स' होत असलेली कामे कंपनीने स्वत:च करण्याचा निर्णय घेतल्यास वा पूर्वी विचाराधीन असलेला विस्तार नाशिकमध्ये केल्यास शहरात रोजगारनिर्मिती होण्याची चिन्हे आहेत.
अधिग्रहणामुळे नाशिकमधील कंपनीच्या प्रकल्पांना नवऊर्जा मिळेल. भविष्यात कंपनीकडून विस्तार झाल्यास, त्याचा लाभ रोजगारनिर्मितीला होईल. याशिवाय आयटी पार्कलाही पूरक वातावरण तयार होईल.अरविंद कुलकर्णी, आयटी-बीपीओ अभ्यासक